मुंबई : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झालेत. परभणीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झालेत. तर कोकणात सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांचा विजय झालाय. त्यांनी शिवसेनेचे राजीव साबळे यांचा पराभव केलाय. तिकडे अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर मोठा विजय मिळवलाय. तिकडे वर्धा-चंद्रपूरमध्ये भाजपचे रामदास आंबटकर यांचा विजय झालाय. मात्र, या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये टाय पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषदेसाठी ५ जागांपैकी २ जागा शिवसेनेनं तर २ जागा भाजपने जिंकल्या. नाशिक विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे विजयी झालेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे जनता दल आघाडीचे अॅडव्होकेट शिवाजी सहाणे यांचा पराभव केला.  भाजपाने राष्ट्रवादीला चाल दिलेली असताना सेनेचे नरेंद्र दराडे हे १६९ या विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. या विजयाचे शिल्पकार ठरले ते शिवसेना नेते दादा भुसे. तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेच्या विप्लव बजोरिया यांनी २५६ मतं मिळवून आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव केला. 


देशमुख यांना २२१ मतं मिळाली. तर भाजप उमेदवार सुरेश नागरे यांना ४ मतं मिळाली. १६ मतं अवैध ठरली. तर २ मतं नोटाला पडली आहेत. बजोरिया यांचा हा विजय आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय. ही जागा आधी आघाडीच्या बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे होती. राष्ट्रवादीकडे १६२ तर काँग्रेसकडे १३५ मतं होती. शिवसेनेकडे अवघी ९७ आणि भाजपकडे ५१ मतं होती. असं चित्र असूनही आघाडीच्या हातून ही जागा गेलीय. 


वर्धा-गडचिरोली-चंद्रपुर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. रामदास आंबटकर यांचा ३७  मतांनी विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांचा पराभव केला. या निवडणुकीत १०५९  मतदार होते. यातील १०५६ मतदारांनी मतदान केले.