राष्ट्रवादीला हव्या विधानसभेच्या अर्ध्या जागा, आघाडीच्या पहिल्याच बैठकीत मतमतांतर
विधानसभा निवडणुकीसाठीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत मतमतांतर पाहायला मिळाली.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत मतमतांतर पाहायला मिळाली. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी चांगली असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत ५०-५० टक्के जागा वाटप व्हावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. तर २०१४ विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आधारीत जागा वाटप व्हावे, यासाठी काँग्रेसने आग्रह धरला.
२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह ज्या जागांवर दुसऱ्या क्रमांकावर पक्षाचा उमेदवार राहिला, त्या जागा पक्षाला मिळाव्या, अशी मागणी काँग्रेसने केली.
या गणितानुसार २०१४ साली काँग्रेसने जिंकलेल्या ४२ जागा आणि दुसऱ्या क्रमांकावरेच काँग्रेसचे ६४ उमेदवार, अशा १०६ जागा थेट मिळाव्यात. तर राष्ट्रवादीने जिंकलेल्या ४१ जागा आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ५४ अशा एकूण ९५ जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली.
विधानसभेच्या उरलेल्या ८७ जागांबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा व्हावी, अशी भूमिका काँग्रेसने या बैठकीमध्ये घेतली.