अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. नाना पटोले यांनी लक्षणे जाणवू लागल्यामुळे कोरोना टेस्ट केली होती. यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. येत्या ७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होत आहे.
नाना पटोले यांच्या अनुपस्थितीमुळे पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविनाच चालवले जाणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष हे पावसाळी अधिवेशन चालवतील. याआधी मंत्री सुनील केदार यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सुनील केदार यांच्यावर ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
विधिमंडळाच्या अधिवेशनाआधी सगळे आमदार, मंत्री, अधिकारी, विधिमंडळातले कर्मचारी यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तरच त्यांना अधिवेशनात प्रवेश मिळणार आहे. तसंच विधिमंडळात येण्यासाठी प्रत्येकाला प्रवेशिकेसोबतच आपला कोरोना निगेटिव्ह रिपोर्टही सोबत ठेवावा लागणार आहे.