Mumbai News : मुंबईमध्ये मराठी माणसांची टक्केवारी कमी झाल्याचं अनेकदा दिसून येतं. अशातच इनडीड या नोकरीबाबत माहिती देणाऱ्या वेबसाइटवर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. मरोळ इथल्या आर्या गोल्ड नावाच्या कंपनीतील डायमंड फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन मॅनेजरच्या जागेसाठी ही जाहिरात आहे. मात्र त्यासाठी केवळ महाराष्ट्रीयन नसलेले उमेदवार अर्ज करु शकतात, असा उल्लेख यात स्पष्टपणे करण्यात आलाय. ज्या मुंबईसाठी आपल्या 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्याठिकाणी महाराष्ट्रातील नागरिकांचीच गळचेपी होत असल्याचं दिसून आलंय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक मोठ्या कंपन्या, दुकाने आपला व्यवसाय करतात. मात्र मुंबईत नोकरीत महाराष्ट्रातील माणसालाच स्थान नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. त्यावर आता विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाले विजय वडेट्टीवार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा कंपन्या सरकारचं जुमानत नाही. कायदा नसेल आणि नियम असेल तर नियमांची ऐसी तैसी करून मनाला वाटेल तसं काम करतात. याची तात्काळ दखल सरकारकडून घेतली गेली पाहिजे. एकही महाराष्ट्राबाहेरचा माणूस त्या कंपनीत कामाला लागता कामा नये. देशातील लोकं मुंबईत शिकायला येतात. शिक्षण संस्था अनेक या महाराष्ट्रात आहेत. पण नोकरीत तुम्ही बाहेरच्या लोकांना प्राधान्य देताय. पण या कंपनीची बेईमानी दिसून येते, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच आर्या गोल्ड कंपनीवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी देखील त्यांनी केलीये. महाराष्ट्रात अशी हिंमत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. माजी नगरसेवक प्रमोद सावंत यांनी कंपनीत घुसून मालकाला झापलं. अनावधानाने चूक झाल्याचे मालक बंटी रुप्रेजा यांनी मान्य केलं आहे. पुन्हा असा प्रकार घडल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा देखील प्रमोद सावंत यांनी दिला आहे.