अवांतर वाचनाच्या पुस्तक खरेदीवर तावडेंचा खुलासा चुकीचा
शालेय शिक्षण विभागाने मुलांच्या अवांतर वाचनासाठी निश्चित केलेल्या पुस्तक खरेदीबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलेले खुलासे वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. शाळेत वितरीत होऊ घातलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर नसल्याचा तावडे यांचा दावा चुकीचा आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शालेय शिक्षण विभागाने मुलांच्या अवांतर वाचनासाठी निश्चित केलेल्या पुस्तक खरेदीबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलेले खुलासे वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. शाळेत वितरीत होऊ घातलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर नसल्याचा तावडे यांचा दावा चुकीचा आहे.
पुणे येथील पत्रकार परिषदेत आपण ज्या पुस्तकांमधील मजकूर वाचून दाखवला, तीच पुस्तके शाळांमध्ये वितरीत केली जाणार होती. परंतु, पुस्तकांमधील आक्षेपार्ह मजकूर समोर आणल्यानंतर शिक्षण विभागाने मूळ पुस्तकांचे गठ्ठे गायब केले असून, प्रकाशकांना ५-६ दिवसात सुधारित पुस्तके छापण्याची तंबी देण्यात आल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केलाय. शिक्षण मंत्री म्हणतात की, विरोधी पक्षनेत्यांनी दाखवलेली पुस्तके कुंभमेळ्यात वितरित झाली होती.
शाळांना दिली जाणारी पुस्तके वेगळी आहेत. पण एकाच प्रकाशकाची एकाच नावाची दोन वेगवेगळी पुस्तके कशी असू शकतात? असा सवाल विखे-पाटील यांनी उपस्थित केलाय. ‘बाळ नचिकेत’ या पुस्तकाबाबत खुलासा करताना शिक्षण मंत्र्यांनी ‘ऋषीअत्री’, ‘श्री सारदा माता’ या पुस्तकांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला नाही. यावरून शिक्षण मंत्री लपवाछपवी करीत असल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केलाय.
या पुस्तकांच्या खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही आरोप आम्ही केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत प्रकाशन ‘भारतीय विचार साधना’ यांचे जे पुस्तक २० रूपयाला उपलब्ध आहे, तेच पुस्तक सरकारने चक्क ५० रूपयांत खरेदी केले असून, या प्रकाशनाकडून तब्बल ८ कोटी १७ लाख रुपयांची खरेदी झाली आहे. ही पुस्तके तब्बल अडीच पट जादा किंमतीने का खरेदी करण्यात आली, याबाबत शिक्षण मंत्र्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नाही, असेही विखे पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या जीवनावरील पुस्तके खरेदी करण्यासाठी कोणते निकष लावले आहेत, याचेही स्पष्टीकरण विरोधी पक्षनेत्यांनी मागितले असून, सरकारने तातडीने ही खरेदी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या पुस्तक खरेदीमधील ‘भारत के त्योहार’ पुस्तकातून दिवाळी आणि ईद गायब झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारतातील हे दोन मोठे सणच गायब असतील तर पुस्तकांना मंजुरी देताना तज्ज्ञ समिती झोपा काढत होती का,अशी विचारणाही त्यांनी केली आहे.