`शिवस्मारक` प्रकल्प अनैतिक मार्गानं रेटला जातोय - विनायक मेटे
`प्रकल्प सल्लागार आणि कंत्राटदार यांच्याशी अधिकाऱ्यांचं संगनमत`
मुंबई : शिवस्मारकाच्या अनियमिततेची चौकशी करा नाही तर मला विधान परिषदेत अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणावा लागेल, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी केलीय. शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या मेटेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अधिकाऱ्यांवर आरोप केलेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मंत्रालयीन अधिकारी प्रकल्प अनैतिकतेने रेटत असल्याचा विनायक मेटे यांनी आरोप केलाय.
प्रकल्प सल्लागार आणि कंत्राटदार यांच्याशी अधिकाऱ्यांचं संगनमत असल्याचा मेटेंनी पत्रात आरोप केलाय.
दरम्यान, अरबी सुमद्रातील भव्य स्मारकाच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साधारणतः दोन वर्षांपूर्वी डिसेंबर २०१६ मध्ये या स्मारकाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. मात्र, शिवस्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नव्हती.
आता या स्मारकातील परवानगी आणि इतर बाबींच्या अडचणी दूर झाल्या असून शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीतीत समुद्रात आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
'एल अॅन्ड टी' कंपनीला हे स्मारक उभारण्याचे कंत्राट मिळाले असून तीन वर्षात शिवस्मारकाचे काम पूर्ण करायचे आहे.