मुंबई : केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची तब्बल 26 महिन्यांनंतर राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.  यानुसार वाहतूक नियमांचं उल्लंघन करणं चांगलंच महागात पडणार आहे. बेशिस्त वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापुढे हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्याचं आता थेट लायसन्सच रद्द होणार आहे. दुचाकीस्वारांच्या अनेक अपघातात हेल्मेट नसल्याने मृत्यू ओढावतो. त्यामुळे हेल्मेट बंधनकार करण्यात आलं असून हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्यास 500 रुपये दंडासह तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द केलं जाणार आहे. विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या चालकाचंदेखील लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे.


केंद्राच्या या नव्या कायद्यानुसार वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना 1 हजार रुपये दंड, तर चार चाकी वाहन मालकांना 2 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. लायसन्स नसतानाही वाहन चालवणात असल्यास तब्बल 5 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.


इतकंच नाही तर गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणंही महागात पडणार आहे. गाडीला रिफ्लेक्टर्स नसणं किंवा टेललाईट नसणं यासाठी एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. वेगमर्यादेचं उल्लंघन केल्यास दुचाकीसाठी 1 हजार, ट्रॅक्टरसाठी दीड हजार, चारचाकी वाहनांसाठी २ हजार रुपयांचा दंड असेल.