चाचा चौधरीपेक्षाही तल्लख बुद्धी, मुंबईच्या रिक्षावाल्याचं General Knowledge पाहून व्हाल थक्क
सोशल मीडियावर मुंबईतल्या रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल, अनेक देशांच्या नावांसह त्यांचे राष्ट्रपती, पंतप्रधानांची नावंही तोंडपाठ
Viral News : मुंबईत रिक्षा (Auto Rikshaw) आणि टॅक्सीने (Taxi) जवळपास प्रत्येकाने प्रवास केला असेल. या प्रवासात काही प्रवासी रिक्षा किंवा त्या टॅक्सी चालकाशी गप्पा मारतात. त्यांच्याकडून आपल्याला आसपासच्या अनेक घडामोडींची माहिती मिळते. काही वेळा चालक आपल्या स्वत:बद्दलची माहितीही अगदी मनमोकळेपणाने सांगत असतात. सोशल मीडियावर (Social Media) सध्या अशाच एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. पण रिक्षा चालक इतरांपेक्षा काहीसा वेगळा आहे. राजीव कृष्ण या प्रवाशाने मुंबईतल्या रिक्षावाल्याचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शेअर केला आहे.
मुंबईचा हुशार रिक्षावाला
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या रिक्षाचालकाचं नाव रामदेव असून ते 61 वर्षांचे आहेत. रामदेव यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, त्यामुळे त्यांना शिक्षणही घेता आलं नाही. पण त्यांची स्मृती मात्र एका उच्च शिक्षित व्यक्तीलाही लाजवेल अशी आहे.
चाचा चौधरीपेक्षाही तल्लख बुद्धी
राजीव कृष्ण हा तरुण रामदेव यांच्या रिक्षाने कामाला जाण्यासाठी निघाला होता. पण मुंबईतल्या ट्रॅफीकमध्ये (Mumbai Traffic) तो अडकला. यावेळी दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चर्चेची सुरुवात रामदेव यांनी केली. त्यांनी राजीवला सहज म्हणूनच किती देश फिरलायस असा प्रश्न विचारला. यावर राजीवने काही देशांची नावं सांगितली. त्यानंतर त्याने राजीवला आपल्याला युरोपातल्या सर्व देशांची नावं माहिती असल्याचं सांगितलं. सुरुवातीला राजीवला यावर विश्वास बसला नाही. पण रामदेव यांनी अवघ्या 44 सेकंदात युरोपातील सर्व देशांची नावं सांगितली. ते ऐकून राजीवला आश्चर्याचा धक्काच बसला.
अनेक देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची नावं तोंडपाठ
रामदेव यांना अनेक देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची नावंही अगदी तोंडपाठ आहेत. महाराष्ट्रात किती जिल्हे आणि त्यांची नावंही त्यांनी अगदी पटापट सांगितली. इतकंच नाही तर गुजरात आणि उत्तर प्रदेशमधल्या सर्व जिल्ह्यांची नावंही त्यांनी बोलून दाखवली. रामदेव हे महाराष्ट्रातील सिंधुदर्ग इथे रहाणारे आहेत. पैसे कमवण्यासाठी ते मुंबईत आले.
आर्थिक परिस्थितीमुळे रामदेव यांना शिक्षण घेता आलं नाही. पण त्यांना वाचणाची प्रचंड आवड आहे. हे सर्व ज्ञान वाचणातून मिळवल्याचं ते सांगतात. त्यांच्या तल्लख बुद्धीने राजीव थक्क झाला. त्याने रामदेव यांचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यात त्याने लिहिलंय 'रिक्षा प्रवासातील ही 60 मिनिटं माझ्या आयुष्यात ज्ञान देणारी ठरलीत'.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रामदेव यांच्या बुद्धीचं कौतुक केलं आहे. इच्छा असेल तर माणूस काहीही करु शकतो हेच या व्हिडिओत पुन्हा एकदा सिद्ध झालंय.