`भावा, ही चाळ आहे`, मुंबईत 1 BHK फ्लॅटसाठी मागतोय तब्बल 45 हजार रुपये भाडं, VIDEO व्हायरल
मुंबईतील एका 1 बीएचके फ्लॅटसाठी तब्बल 45 हजार रुपये भाडं मागितल्याने नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. नेटकऱ्यांनी इतकं भाडं आकारल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
मुंबईत भाड्याने घर घ्यायचं असेल तर 1 RK साठी जवळपास 16 ते 20 हजार आणि 1BHK साठी 24 ते 30 हजार रुपये मोजावे लागतात. मुंबईत नोकरीसाठी येणारे तरुण-तरुणी, कुटुंब भाड्याच्या घरांमध्ये राहत असतात. भाड्याचं घऱ शोधण्यासाठी एजंट्स किंवा नो ब्रोकर, हाऊसिंग अशा वेबसाईट्सची मदत घेतली जाते. दरम्यान मुंबईत घरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना भाड्याने राहणंही काहींनी परवडेनासं झालं आहे. त्यातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे यामध्ये 1BHK साठी तब्बल 45 हजार रुपये भाडं मागण्यात आलं आहे.
माटुंगा येथे स्थित हे एक बेडरूमचे अपार्टमेंट आहे. (सामान्य भाषेत याला 1BHK म्हटलं जातं). या घरात एक लहान लिव्हिंग/ड्रॉइंग रूम, बेडरुम आणि एक स्वयंपाकघर आहे. लिव्हिंग रूममधून, एक लहान जिना आहे, जो पोटमाळ्यावर जातो. तिथे सर्व अतिरिक्त सामान ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. या घरासाठी तब्बल 45 हजारांचं भांडं आकारण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामला शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "ओल्ड वाईब 1BHK भाड्य़ावर, फक्त 45 हजारांमध्ये". कॅप्शनमध्ये हे घर माटुंगा पूर्वेला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
45 हजारांच्या भाड्यावरुन इतका गदारोळ का?
या घराचा व्हिडीओ इंस्टाग्रामला व्हायरल झाला असून, एक्सवरही पोहोचला आहे. व्हिडीओ पाहिलेल्यांनी यावर कमेंट करत दोन गोष्टींकडे लक्ष वेधलं आहे. पहिलं म्हणजे इतक्या छोट्या घरासाठी 45 हजारांचं भाडं मागणं आणि दुसरं म्हणजे चाळीतल्या घराच्या नावे ओल्ड वाईब्स म्हणणं.
"जुन्या चाळीला ओल्ड स्कूल/ओल्ड वाईब्स म्हणत 45 हजारांचं भाडं मागत आहेत. भांडवलशाहीने गरिबीला पुढील स्तरावर नेले आहे," अशी कमेंट एकाने केली आहे.
मुंबईतील चाळ म्हणजे निवासी इमारतीचा एक प्रकार जो शहराची एक वेगळी ओळख दर्शवतो. यातील काही इमारती एक-दोन मजले तर काही उंच असतात. या घरांच्या बाहेर जास्त जागा नसते. येथे रांगेत घरं असतात. संपूर्ण कुटुंबे सहसा सिंगल-रूम अपार्टमेंटमध्ये राहत असतात.
चाळी मूळतः 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत (तेव्हाचे मुंबई) गिरण्या, कारखाने आणि गोदींमध्ये काम करण्यासाठी आलेल्या स्थलांतरित कामगारांना राहण्यासाठी बांधण्यात आल्या होत्या.
इंस्टाग्रामवर अनेकांनी 45 हजार भाडं मागितल्याने उपहासात्मकपणे कमेंट केली आहे. तर काहींनी मुंबईतील घरांच्या तुलनेत हा 1BHK फारच मोठा असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने 45 हजार भाडं मागताना लाज वाटत नाही का? असं म्हटलं आहे. तर एकाने 1 कोटी भाडं घ्या असा टोला लगावला आहे.