`तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही`, मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरल
मध्य रेल्वेच्या (Central Railway) नाहूर रेल्वे स्थानकात (Nahur Railway Station) मराठी भाषेवरुन तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रवाशासह वाद घातला. मराठी एकीकरण समितीने (Marathi Ekikaran Samiti) तसा दावा केला असून, प्रवाशाने यासंदर्भात मध्य रेल्वेकडे लेखी तक्रार दिली आहे.
मध्य रेल्वेवर तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्याने मराठी भाषेवरुन प्रवाशासह वाद घातला आहे. आपल्याला मराठी येत नसून हिंदीत बोला असं कर्मचारी उर्मट भाषेत बोलल्याची प्रवाशाची तक्रार आहे. हिंदीत बोलल्याशिवाय तिकीट देणार नाही असं त्याचं म्हणणं होतं असंही त्यांनी सांगितलं आहे. नाहूर रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. मराठी एकीकरण समितीने या प्रकरणात लक्ष घातलं असून प्रवाशाने यासंदर्भात मध्य रेल्वेकडे लेखी तक्रार दिली आहे.
अमोल माने या प्रवाशासोबत हा प्रकार घडला आहे. अमोल माने नाहूर स्थानकात लोकलचे तिकिट काढण्यास पोहोचले होते. यावेळी तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याशी त्यांना मराठीत संवाद साधला. मात्र कर्मचाऱ्याने त्यांना हिंदीत बोला असं सांगितलं. अमोल माने यांनी आपण मराठीतच बोलणार असा आग्रह धरला. यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमोल माने यांनी मोबाईलमध्ये सगळा संवाद रेकॉर्ड केला आहे.
नेमका संवाद काय झाला?
कर्मचारी - मी तुमच्याशी काय बोललो होतो ते सांगा
प्रवासी (अमोल माने) - मला हिंदीत बोल सांगणारा तू कोण
कर्मचारी - मला मराठी येत नाही तर मी मराठीत कसं बोलू
प्रवासी (अमोल माने) - मला येत नाही तर मी कसं बोलणार
कर्मचारी - मला मराठी येत नाही काय करायचं ते करा असं तू म्हणालास. ही तुझी भाषा का
प्रवासी (अमोल माने) - तुझ्या नावाची पाटी कुठे आहे, हसतोस काय
कर्मचारी - तुमच्याकडे काही हक्क नाही की मी तुम्हाला दाखवावं
प्रवासी (अमोल माने) - तुझं नाव काय?
कर्मचारी - तुम्हला जे हवं ते करा, मागे रांग वाढत आहे
प्रवासी (अमोल माने) - मला हिंदी बोलण सांगणारा तू कोण, माझी माफी माग
कर्मचारी - मी माफी मागणार नाही. मला मराठी समजत नाही, हिंदीत बोला असं मी सांगितलं
प्रवासी (अमोल माने) - तू तशी विनंती केली नाहीस, तुला मराठी आलं पाहिजे, जास्त शहाणा होऊ नको.
हा उर्मट भाषेत आवाज वाढवून हिंदीत बोला सांगत आहे.
अमोल माने यांची मध्य रेल्वेकडे तक्रार
"रविवार दिनांक 24/11/2024 रोजी सायंकाळी 6.50 दरम्यान मी तिकीट काढण्यासाठी आलो असता मराठीमध्ये बोलत होतो. पण तिकीट देणारा मोठ्या आवाजात बोलला, आपको तिकीट लेना है तो हिंदीमे बोलो. मराठी-बिराठी ईधर नाही चलेगी. त्याचं नाव विचारलं असता त्याने सांगण्यास नकार दिला व आपलं ओळखपत्र लपवलं. माझ्या मराठी भाषेचा अपमान केल्याने त्याच्यावर कारवाई करावी. हिंदी येत नसल्याने तिकीट नाकारलं व उर्मट बोलून माझ्याशी गैरवर्तन करणाऱ्याचे नाव सुखदे सिंह आहे," असं अमोल माने यांनी तक्रारीत सांगितलं आहे.
मराठी एकीकरण समितीने फेसबुकवर पोस्ट करत हा सगळा प्रकार समोर आणला. यानंतर प्रवाशाने मध्य रेल्वेकडे लेखी तक्रार केली आहे. तसंच कठोर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे. याआधी नालासोपाऱ्यात येथे टीसीने मराठी जोडप्याला अडवल्याचा प्रकार समोर आला होता. हिंदी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या त्या टीसीलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.