मुंबई : ब्रिटनमधील 'व्हर्जिन' उद्योग समूहाचे प्रमुख सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पुणे- मुंबई दरम्यान प्रस्तावित "हायपर-लूप" या प्रवासी वाहतूकीसाठीच्या वेगवान तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्पासंदर्भात तसंच हवाई वाहतूक क्षेत्राशी निगडीत चर्चा करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. महाराष्ट्रात 'व्हर्जिन' उद्योग समुहाला उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प निर्माण करण्यात स्वारस्य असल्याचे सांगितले.





फडणवीस सरकारच्या अनेक कामांचा सध्याच्या ठाकरे सरकारकडून आढावा घेतला जात आहे, तर काही योजनांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ब्रॅन्सन आणि उद्धव ठाकरे यांच्यातली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई-पुणे हायपर-लूप योजना ही पूर्णपणे खासगी योजना असून सरकारला यासाठी एक पैशाचाही खर्च होणार नाही, असं रिचर्ड ब्रॅन्सन यांनी स्पष्ट केलं आहे.


'उद्धव ठाकरे यांच्यासोबतची ही भेट औपचारिक होती. या योजनेबाबत जे गैरसमज होते, ते दूर झाले आहेत. जेव्हा सरकार बदलतं आणि तुम्ही मोठ्या योजनेवर काम करत असता तेव्हा तुम्ही नव्या सरकारची भेट घेणं आवश्यक असतं. हायपर-लूप योजनेबाबत जुन्या सरकारप्रमाणेच नवीन सरकारही महत्वाकांक्षी आहे का? हे आम्हाला पाहायचं होतं,'असं ब्रॅन्सन म्हणाले.


राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना हायपर-लूप योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही योजना २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश आहे. हायपर-लूपमुळे मुंबई-पुणे हे अंतर २३ मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकतं.