मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम मुंबईमध्ये आली आहे. सुशांतसिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचा काही संबंध आहे का? याची चौकशी सीबीआय करणार आहे. कारकिर्दीच्या उंचीवर असताना या दोघांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याचाही तपास सीबीआयकडून केला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या संशयास्पद मृत्यूनंतर सीबीआयची टीम दिशा सालियनच्या मृत्यूचीही चौकशी करणार असल्याचं समोर आलं आहे. दिशा सालियान ८ जूनला तिचा होणारा पती आणि काही मित्रांबरोबर मालाडच्या जनकल्याण नगरमधल्या एका बिल्डिंगमध्ये १४व्या मजल्यावर पार्टी करत होती. अचानक दिशा तिच्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा बंद केला. 


बराच वेळ दिशाने दरवाजा उघडला नाही, तेव्हा तिचा होणारा पती आणि मित्र दरवाजा तोडून आत घुसले. बाल्कनीमधून त्यांनी वाकून बघितलं, तर दिशा खाली पडल्याचं त्यांना दिसलं. यानंतर ते दिशाला बोरिवलीच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिकडे दिशाला मृत घोषित करण्यात आलं.


या घटनेच्या एका आठवड्यानंतर १४ जूनला सुशांतसिंग राजपूत आपल्या घरात मृतावस्थेत सापडला. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूमध्ये काही संबंध आहे का? हे सीबीआय तपासून पाहणार आहे. यासाठी सीबीआय दिशाच्या मृत्यूचीही चौकशी करणार आहे.