Mumbai Water Cut:  राज्यासह मुंबईत तापमानाचा पारा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळं धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. पुण्यातील धरणातील पाणीसाठी झपाट्याने कमी होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठाबी कमी झाला आहे. 7 धरणांमध्ये फक्त 19 टक्के इतकांच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं मुंबईकरांवरदेखील पाणीसंकट ओढावणार का? याची भिती होती. मात्र, पालिकेने मुंबईकरांचे हे टेन्शन दूर केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, भातसा, तुळशी, तानसा आणि विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो.  मात्र या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांतून मुंबईला अतिरिक्त पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 7 मे रोजी जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने भातसा आणि अप्पर वैतरणा जलाशयातून मुंबईसाठी अधिक पाणीसाठा मंजुर केला आहे. त्यामुळं मुंबईकरांवरील पाणीसंकट टळणार आहे. 


महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी आढावा बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.  सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष असून दरवर्षीप्रमाणे 31 जुलै 2024पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळं पालिका प्रशासनाने पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं पालिका आयुक्तांनी म्हटलं आहे. 


सातही धरणांमध्ये सध्या 16.48 टक्के इतका पाणीसाठा आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठी कमी आहे. पुरेसा पाऊस पडेपर्यंत पुढील दोन ते अडीच महिने हा पाणीसाठा पुरवावा लागणार आहे. असं असलं तरी सध्या पाणी कपातीची आवश्यकता नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच, देशात यंदा 106 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं सध्या तरी पाणी कपात लागू करण्यात आलेली नाहीये. मात्र, तरीही नागरिकांनी काटकसर करुन पाण्याचा वापर करावा, असं अवाहन पालिकेने केले आहे. 


दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये सध्या 238,550 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेने 16.48 टक्के इतके आहे. याशिवाय, मुंबईला अप्पर वैतरणा धरणातून 91,130 दशलक्ष लिटर आणि भातसा धरणातून 137,000 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मिळणार आहे. पाण्याची बचत होईल, पाण्याचा अपव्यय रोखता येईल. पाण्याचा सर्वांनी काटकसरीने वापर करावा, पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करावा, असं पालिका आयुक्तांनी म्हटलं आहे.