माझ्या शिष्टाईमुळे शिवसेना आणि कंगनामधील वाद मिटला- आठवले
तिने आरपीआय पक्षात प्रवेश केला तर मला १०० टक्के आनंद होईल, भाजपमध्ये प्रवेश केला तर ५० टक्के आनंद होईल.
मुंबई: आगामी काळात अभिनेत्री कंगना राणौत हिने राजकारणात यायचा निर्णय घेतलाच तर रिपाई आणि भाजपमध्ये तिचे स्वागत होईल, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते शुक्रवारी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. सध्या शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यातील वाद अत्यंत टोकाला गेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी कंगना राणौतची भेट घेतली होती.
या भेटीत तुम्ही कंगना राणौतला राजकारणात येण्याची ऑफर दिलीत का, असा प्रश्न आठवले यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर रामदास आठवले यांनी म्हटले की, होय, मी कंगनाला राजकारणात येण्याविषयी विचारले. तुला राजकारणात यायचे असल्यास आरपीआय किंवा भाजपमध्ये तुझे स्वागत आहे, हेदेखील मी तिला सांगितले. मात्र, तुर्तास आपला राजकारणात येण्याचा कोणताही इरादा नाही. मला सध्या चित्रपटसृष्टीतच काम करायचे आहे, असे कंगना राणौत हिने सांगितले.
त्यामुळे कंगना ताबडतोब राजकारणात प्रवेश करण्याची चिन्हे दिसत नाहीत. मात्र, ती भविष्यात राजकारणात आल्यास आम्ही तिचे स्वागत करू. तिने आरपीआय पक्षात प्रवेश केला तर मला १०० टक्के आनंद होईल, भाजपमध्ये प्रवेश केला तर ५० टक्के आनंद होईल. आरपीआयमध्ये तिला लगेच खासदारकीची निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही. तिला चळवळीत काम करावे लागले. पण भाजपमधून तिला नक्कीच खासदारकीची संधी मिळू शकते, असे आठवले यांनी सांगितले.
तसेच आपल्या मध्यस्थीमुळेच शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यातील तणाव निवळल्याचा दावाही आठवले यांनी केला. कंगनाने मुंबईबाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि मुख्यंमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखाशी मी सहमत नाही. मात्र, तिने भावनेच्या भरात हे वक्तव्य केले होते. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवता आली असती. मात्र, आता शिवसेनेने हा विषय मिटवला आहे. मी मध्ये पडल्यामुळे शिवसेनेचा आक्रमकपणा कमी झाला. यानंतर मी कंगना राणौतलाही तू आता काही बोलू नकोस, असा सल्ला दिल्याचे आठवले यांनी सांगितले.