कोणत्याही राज्य सरकारी कर्मचाऱ्याची वेतन कपात केली जाणार नाही...पण
कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कपात केली जाणार नसल्याचं, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कपात केली जाणार नसल्याचं, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण अ, ब आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे पगार हे दोन टप्प्यात होणार आहेत. मार्च महिन्यात जरी या कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ण झाला नाही. तरी लवकरच त्यांना पूर्ण पगार दिला जाणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर चतुर्थ श्रेणीतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार सुरूवातीला देखील कापला जाणार नाही.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केंद्र सरकारचे राज्य सरकारला साडेसहा हजार कोटी रूपये देणे आहेत, ही रक्कम लवकरच देण्याची मागणी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे केली होती. यावरून कोरोनाच्या अशा कठीण काळात राज्य सरकारसमोर आर्थिक घडी बसवणे हे एक आव्हान झालं आहे.
यानंतर आज सकाळी राज्य सरकारने पत्रक काढून अ,ब आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे पगार कपात करण्याबद्दल सूचना दिली होती. मात्र पोलीस आणि डॉक्टर असे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही या कात्रीत सापडत असल्याने, राज्य सरकारवर विरोधी पक्षाकडून टीका होत होती.
मात्र यानंतर आज पुन्हा कोणत्याही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या पगारात कपात होणार नसल्याचं अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री या नात्याने स्पष्ट केलं आहे.