`स्मशानात राहून जनतेची कामे करू`
सरकारी बंगले आणि दालन वाटपात राज्य मंत्री बच्चू कडूंची नाराजी
मुंबई : महाविकासआघाडीच्या खातेवाटपाआधी मंत्र्यांना शासकीय निवास्थानं आणि दालनाचे वाटप करण्यात आले आहे. पण निवास आणि दालनाच्या वाटपानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांवर आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य मंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या अपंग आणि रुग्ण यांना सोईचे होईल अशा प्रकारचे मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर कार्यालय आणि शेजारील बंगल्याची मागणी केली होती.
परंतु काही अधिकाऱ्यांनी जाणीव पूर्वक विधानभवनात कार्यालय आणि मलबार हिल येतील स्मशान जवळील रॉकी हिल १२०२ हा फ्लॅट दिला असल्याने नाराजी व्यक्त केली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला.
कोणत्याही परिस्थितीत चांगलं काम करण्याची तयारी असल्याची सांगत ते म्हणाले, 'हेमा मालिनींच्या बंगल्या जवळ निवास स्थान असावं अशी मागणी आम्ही केली नव्हती. शिवाय मंत्रालयात दालन देण्याऐवजी विविधिमंडळात दिलं गेलं आहे. मंत्रालयात पहिल्या मजल्यावर जर दालन दिलं असतं तर माझ्याकडे येणाऱ्या अपंग बांधवांना तिथे येण्यास सोयीचं झालं असतं.' अशा प्रकारे त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर शेतकरी नेते बच्चू कडू यांनी लगेचच कामाला सुरुवात केली. बच्चू कडू यांनी बुधवारी दर्यापूरमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची अक्षरशः झाडाझडती घेतली. यावेळी त्यांनी कामचुकारपणा करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना इंगा दाखवला. लोकांची कामे वेळेत न करणाऱ्या दोन नायब तहसीलदारांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.