मुंबई : सांगली आणि जळगावमध्ये भाजपनं काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत विजय मिळवला. जनतेनं कौल भाजपच्या बाजूनं दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानलेत. जनतेने भाजवर विश्वास ठेवून आम्हाला नवीन पाठबळ दिलेय, असे ते म्हणालेत. जळगावमध्ये गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे आणि सांगलीत सुभाष देशमुख तसंच चंद्रकांत पाटील यांच्या मेहनतीमुळे भाजपनं विजय साकारल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव महापालिकेत सुरेश जैन यांचा सर्वात मोठा आणि दारुण पराभव झाला आहे. महापालिकेच्या ७५ जागांपैकी ५७ जागा भाजपाने पटकावल्या आहेत, तर शिवसेनेला १५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला शून्यावर समाधान मानावं लागलं आहे. तर एमआयएमने २ जागा पटकावल्या आहेत.


सांगली महापालिकेवर भाजपने अखेर आपला विजयाचा झेंडा फडकावला आहे, महापालिका निवडणुकीत भाजपचे ३९ उमेदवार विजयी झाले आहेत. सांगली महापालिकेत भाजपकडे एक हाती सत्ता आली आहे. भाजपाचा हा विजय फार महत्वाचा मानला जात आहे. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रातील एक बालेकिल्ला ढासळला आहे. भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून, पहिल्यांदाच भाजपला सांगली महापालिकेत सत्ता मिळाली आहे. एवढंच नाही, तर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती, पण जयंत पाटील यांना सांगली महापालिकेत मोठा पराभवाचा सामना करावा लागला.