मुंबई: भाजप सरकारच्या काळातील निर्णय बदलण्याचा किंवा फेरविचार करण्याचा सपाटा लावणाऱ्या महाविकासआघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक दणका बसण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या शीना बोरा हत्याप्रकरण तपासाचा फेरआढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया 'लेट मी से इट नाऊ' या आत्मचरित्रामुळे महाविकासआघाडीच्या हाती फडणवीस सरकारविरोधात आयते कोलीत मिळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसाबला हिंदू दहशतवादी ठरवायचा प्लॅन होता- राकेश मारिया


राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात शीना-बोरा हत्याकांडाच्या तपासाबाबत अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असताना राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. या बदलीमागे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचा आरोप मारियांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती पुरवल्याचे मारिया यांनी पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळे शीना बोरा हत्याकांडांच्या फडणवीस सरकारच्या काळातील तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. 


याबाबत पत्रकारांनी मंगळवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, आम्ही आता राकेश मारिया यांच्याकडून पुस्तकात लिहलेल्या माहितीबद्दल विचारू. आम्ही त्यांच्याशी चर्चा करून फडणवीस सरकारच्या काळात नेमके काय घडले होते, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू. यानंतर गरज पडल्यास चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे देशमुख यांनी सांगितले. 



त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. २०१५ मध्ये 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी वाद टाळण्यासाठी राकेश मारिया यांची उचलबांगडी केल्याचे म्हटले होते. तपास अधिकाऱ्यांनी तपास करावा, पोलीस आयुक्तांचं काम देखरेख करणे आहे, जर मारिया अनेकदा खार पोलीस स्टेशनला गेले नसते तरी चालले असते, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यामुळे अनेकांनी फडणवीसांच्या भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित केले होते.