Weather Updates : अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातील थंडीनं पुन्हा एकदा या पावसावर मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. उत्तरेकडे पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं ही शीतलहर आता थेट महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकली असून, परिणामी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारपासूनच राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य महाराष्ट्रासह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक इथंही तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात असून, पुढील काही दिवसांसाठी हीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


मुंबईही गारठली! (Mumbai Weather) 


दमट वातावरण आणि पावसाळी वातावरणाला शह देत अखेर मुंबईतही थंडीनं प्रवेश केला आहे. मुंबई आणि नजीकच्या परिसरात किमान तापमान 20 अंशांहूनही कमी नोंदवण्यात आलं आहे. तर, कमाल तापमानाचा आकडाही 30 अंशांपेक्षा कमी झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बुधवारी तापमानात आणखी दोन अंशानी घट नोंदवली जाऊ शकते.


हेसुद्धा वाचा : Iran Attack Pakistan: पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा मारा  


डिसेंबर महिना आणि त्यानंतर जानेवारीतील काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वातावरणात झालेला हा बदल अनेकांनाच दिलासा देऊन जात आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी राज्याच्या दिशेनं वाटचाल केल्यामुळं बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा घसरला आहे. दरम्यान, वाऱ्याचा हा टप्पा पुढे सरकल्यानंतर मात्र तापमानात किंचित वाढ नाकारता येत नाही. 


इथं थंडीचं प्रमाण वाढलेलं असतानाच तिथं सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. डोंगराळ आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये दाट धुकं असल्यानं वाहतुकीवर याचे थेट परिणाम होताना दिसणार आहेत. 



आयएमडीच्या अंदाजानुसार देशातील दिल्ली, हरियाणा भागात थंडीचा कडाका वाढणार आहे. शिवाय या भागांसोूतच चंदीगढ, पंजाबमध्ये धुक्याची चादर आणखी अडचणी निर्माण करणार आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरमध्येही थंडीचा प्रकोप वाढणार असून, तेथून वाहणाऱ्या शीतलहरींमुळं महाराष्ट्रही गारठणार आहे.