ममता बॅनर्जी आणि शिवसेना नेत्यांमध्ये बैठक, काय ठरलं बैठकीत?
मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी यांचा `जय मराठा, जय बांगला`चा नारा
मुंबई : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आजपासून तीन दिवसांच्या मुंबईत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी मुंबईत दाखल झाल्या. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ममता बॅनर्जी आपल्या मुंबई दौऱ्यात उद्योगपतींची बैठक घेणार आहेत. तसंच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.
ममता बॅनर्जी - शिवसेना नेत्यांची भेट
ममता बॅनर्जी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेणार आहेत. त्याआधी आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्रायडेंट हॉटेलमध्ये ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.
बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर दिली. एक-दोन वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी मुंबईत आलेल्या तेव्हाही आम्ही त्यांची भेट घेतली होती, आमचं मित्रत्वाचं नातं आहे. मुंबईत आल्यानंतर त्यांचं स्वागत करणं हे स्वाभाविक आहे, आणि त्यामुळेच आम्ही त्यांची भेट घेतली असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्याबरोबर अनेक विषयांवर चर्चा झाली. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती, पण बायोबबलमुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मी आणि खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी प्रार्थना
ममता बॅनर्जी यांचं आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर विमानतळावरून त्यांनी थेट सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीत आराम पडो, अशी प्रार्थना करतानाच जय मराठा, जय बंगाल अशी घोषणा त्यांनी यावेळी दिली. त्यानंतर त्यांनी शहीद तुकाराम ओंबळेंच्या स्मारकावर आदरांजली वाहिली.