Western Railway: मुंबईकर आणि गर्दी हे समिकरण वर्षानुवर्षे आपण पाहतोय. या गर्दीचा सर्वात जास्त ताण मुंबई लोकलवर पडतो. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता रेल्वे प्रशासनदेखील आपल्या सेवांमध्ये महत्वाचे बदल करत असतं. याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. काय आहे हा निर्णय? याचा प्रवाशांना कसा होणार फायदा? जाणून घेऊया.  


12 ऐवजी 15 डब्यांची लोकल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांचा विस्तार केल्याचे आपण गेल्या काही दिवासांपासून पाहतोय. आधीची लहान रेल्वे स्थानके मोठी करण्यात येत आहेत. त्याचसोबत आता रेल्वेचे डबेदेखील वाढवण्यात येत आहेत. याआधी धावणाऱ्या 12 डब्यांच्या लोकलऐवजी आता 15 डब्यांची लोकल पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणार आहे. 


रोजच्या फेऱ्यांची संख्याही वाढणार


प्रवाशांच्या सोयीसाठी 1 ऑक्टोबरपासून ही सेवा उपलब्ध होणार आहे. सकाळ, संध्याकाळी ऑफिसला येण्या-जाण्याच्या वेळात होणारी खूप गर्दी यामुळे काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. याअंतर्गत 12 डब्यांच्या 10 गाड्यांचे रुपांतर 15 डब्यात करण्यात येत आहे. यासोबत रोजच्या फेऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.  


सध्याची स्थिती काय?


सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला 15 डब्यांच्या 199 फेऱ्या धावत आहेत. असे असले तरी वाढती प्रवासी संख्या पाहता हे कोचही अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून यात वाढ होतेय. आता 12 डब्यांच्या 10 लोकल 15 डब्यांच्या केल्या जाणार आहेत. 12 अतिरिक्त फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळे आता 15 डब्यांच्या 199 ऐवजी आता एकूण 209 इतक्या फेऱ्या होतील. प्लॅटफॉर्मवरील गर्दी थोडी कमी होऊन प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची गरज नसेल. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर  धावणाऱ्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढवावी, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना सातत्याने आवाज उठवत असतात. त्या दृष्टीकोनातून हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ डबे वाढवून उपयोग नाही, तर वेळेवर लोकल सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होतेय.


फेऱ्यांची संख्या


पश्चिम रेल्वेच्या या 15 डब्यांच्या लोकल अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेला धावणार आहेत. या वाढलेल्या फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या 1 हजार 394 वरून आता 1 हजार 406 इतकी होणार आहे.