COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशनवरचा पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर तब्बल सात तासांनी या स्टेशनमधून पहिली लोकल रवाना झालीय. रेल्वे प्रशासनाकडून हार्बर मार्गावर ही पहिली लोकल रवाना करण्यात आलीय. परंतु, पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक मात्र अजूनही ठप्पच आहे. अप आणि डाऊन लाईनची वाहतूक संध्याकाळी ७ पर्यंत सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर स्लो लाईनवरची अप आणि डाऊन वाहतूक रात्री १२ नंतर सुरू होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली आहे. अंधेरी ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही रेल्वे सेवा सुरु केल्याचं रवींद्र भाकर म्हणाले. 


रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या पुलांचं ऑडिट नेहमी होतं पण झालेली घटना पाहता पुन्हा इतर यंत्रणांसोबत समन्वय साधून पाहणी करू. रोड ओव्हर ब्रीज हा महानगर पालिकेच्या अखत्यारीत येतो पण याबद्दल पश्चिम रेल्वे सेफ्टी कमीशनर चौकशी करणार आहेत. कोणत्या यंत्रणांकडून निष्काळजीपणा झाला हे त्या रिपोर्टनंतर स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया रवींद्र भाकर यांनी दिली.


तर दुसरीकडे पूल रेल्वेचाच असून त्याच्या डागडुजीसाठीचा निधी रेल्वेला दिल्याचा दावा महापौर महाडेश्वर यांनी केला होता. 'गोखले पुलाच्या डागडुजीची जबाबदारी पालिकेची नव्हतीच... डागडुजीसाठी पालिका पैसे देते... ही जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली होती. सोबतच, पुलाची डागडुजी व्यवस्थित झाली नाही, असा आरोपही महाडेश्वर यांनी केलाय.