मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असं धक्कादायक विधान पश्चिम रेल्वेचा टीसी आशिष पांडेने केल्यानंतर वाद पेटला होता. एका व्यावसायिकांसोबत फोनवर बोलतना त्याने हे विधान केलं होतं. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत होता. दरम्यान या मराठीद्वेष्टा टीसीच्या मुजोरीला पश्चिम रेल्वेने चाप लावला आहे. टीसी आशिष पांडेचं निलंबन करण्यात आलं आहे. वेस्टर्न रेल्वेच्या डीआरएमने हे निलंबन केलं आहे. तसंच प्रकरणाची चौकशी करण्याचेही आदेश पश्चिम रेल्वेने दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिष पांडे याने मराठी आणि मुस्लिमांबद्दल भेदभाव करणारं आणि आक्षेपार्ह विधान केलं आहे. आशिष पांडे हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून विक्रोळीत वास्तव्यास आहे. आपण काही झालं तरी मराठी किंवा मुस्लिम व्यवसायांना मदत करणार नाही, तसंच मराठी किंवा मुस्लिम चालकांच्या रिक्षातही बसत नाही असं तो म्हणाला होता. 22 सप्टेंबरला एका युजरने एक्सवर ही ऑडिओ क्लिप शेअर केली होती. यानंतर काही वेळातच ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. 


आशिष पांडे नेमकं काय म्हणाला?


"माझं नाव आशिष पांडे असून मी उत्तर प्रदेशचा आहे. विक्रोळीतील टागोर नगरमध्ये मी राहतो. जेव्हापासून मी मोठा झालो आहे तेव्हापासून मराठी आणि मुस्लिमांना बिझनेस देतच नाही. रिक्षावाला मराठी किंवा मुस्लिम असेल तर मी त्यात बसतच नाही. मी तुमचं ट्रूकॉलरवर नाव पाहिलं तेव्हा हा महाराष्ट्रीयन असून मला त्याच्यासोबतच धंदाच करायचा नाही असं ठरवलं. मी त्याला नफा देणार नाही. मी आता 1770 घेऊन जात आहे, 10 पर्यंत 5 हजार कमावले असतील. मला पैशांची हौस नाही. पण मुंबईत राहून मराठी आणि मुस्लिम व्यक्तीला एक रुपयाचा बिझनेस द्यायचा नाही असं ठरवलं आहे," असं आशिष पांडे म्हणाला आहे. 



पश्चिम रेल्वेकडून कारवाई


पश्चिम रेल्वेने या या ऑडिओ क्लिपची दखल घेत तात्काळ कारवाई केली आहे. "आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत आहोत. धार्मिक समुदाय आणि महाराष्ट्रीयन लोकांबद्दल अशा प्रकारचं विधान कऱणाऱ्या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे. सध्या चौकशी बाकी आहे. जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी सविस्तर चौकशी केली जाईल आणि निष्कर्षांच्या आधारे योग्य कारवाई निश्चित केली जाईल," अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.



दरम्यान आशिष पांडेच्या या विधानाची दखल मनसेनेही घेतली आहे. मनसेने आशिष पांडेला मारहाण केली असून, त्याला आपलं वागणं सुधारण्यास सांगितलं आहे.