मुंबई : कुर्ला पश्चिम येथील प्रिमियम कंपनीच्या जागेवरील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या प्रश्नावर भाजपा आमदार अँड. आशिष शेलार यांनी मुंबईतील रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांकडे सरकारचे लक्ष वेधले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या 40% हुन अधिक योजना रखडल्या आहेत. यातील काही बिल्डर ईडी, पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा यांच्या विविध चौकशांमध्ये अडकले आहेत. काहीजण कारागृहात आहेत. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांची ससेहोलपट सुरु आहे.


मुळ घर तोडले गेले. बिल्डरकडून दोन वर्षांनंतर पुढचे भाडे मिळणे बंद झाले त्यामुळे त्यांना आता कोणी वाली उरलेला नाही. अशावेळी सरकारने याबाबत काहीतरी योजना तयार करुन अशा झोपडपट्टीधारकांना भाडे कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच पुनर्वसनाचे घर मिळावे यासाठी सरकार काय प्रयत्न करणार? असा प्रश्न आमदार अँड. आशिष शेलार यांनी केला.


त्यावर उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या रहिवाशांसाठी अभय योजना तयार करण्यात आली आहे.  तसेच, या योजनेचा फायदा 523 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना होईल. ही फाईल गृहनिर्माण विभागाकडून मुख्य सचिवांकडून मंजूर होऊन मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजूरीसाठी गेली आहे. येत्या दोन दिवसात त्यावर स्वाक्षरी होणे अपेक्षित असल्याचेही मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.