मुंबई : एकीकडे राज्यात आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीचं सरकार येणार असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटत असतानाच एका रात्रीत सगळी राजकीय परिस्थिती बदलली. एका रात्रीत हा राजकीय भूकंप घडला. राजकारणात सध्या परिस्थिती असं काही होईल याची कल्पना देखील कोणाला नव्हती. सकाळी ८ वाजेच्या दरम्यान माध्यमांना देखील याची माहिती नसताना राष्ट्रपती भवनावर शपथविधी सुरु झाला. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिसत होते. पण जेव्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना अजित पवार उठले तेव्हा शिवसेनेसह इतर सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना विश्वास बसला नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात गेल्या १ महिन्यापासून सत्तासंघर्ष सुरु होता. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यंमत्रीपदावरुन वाद सुरु होता. दोन्ही ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम होते. त्यामुळे महायुतीकडे बहुमत असताना देखील सत्ता स्थापन झाली नाही. शिवसेनेने एक पाऊट पुढे टाकत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु केली. या दरम्यान संजय राऊत यांच्याकडून भाजपवर सतत टीका होत होती. पण भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. भाजपचे नेते देखील वेट अँड वॉच असंच म्हणत होते. अखेर हे वेट आणि 'वॉच' नेमकं काय हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज आलं.


दिल्लीपासून -गल्लीपर्यंत बैठका आणि भेटीगाठी सुरु होत्या. कधी फोनवरुन, कधी दिल्लीत, कधी हॉटेलमध्ये तर कधी नेत्यांच्या निवासस्थानी चर्चा सुरु होत्या. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद जवळपास निश्चित झालं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादी देखील शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी सकारात्मक होती. एक दोन दिवसात महाविकासआघाडी सरकार स्थापनेचा दावा करेल अशी चर्चा असताना अचानक सगळं चित्र बदललं. 


भाजपने थेट राष्ट्रवादीचे मोठे नेते अजित पवार यांनाच आपल्यासोबत घेतलं. देवेंद्र फडणवीस यांनी थेट घड्याळ्याची साथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत काही आमदार हे भाजपला समर्थन देण्याची शक्यता आहे. ३० नोव्हेंबरला दोघांनाही बहुमत सिद्ध करायचं आहे.