`कोहिनूर` महागात! ईडी चौकशी करत असलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय?
बंद पडलेल्या `कोहिनूर मिल`च्या जागेवर उभा राहिलेला `कोहिनूर स्क्वेअर` हा तब्बल २१०० कोटी रुपयांचा अवाढव्य प्रकल्प आहे
मुंबई : दादरसारख्या मध्यवर्ती भागातील बंद पडलेली कोहिनूर मिल नंबर - तीन'ची चार एकर जागा 'नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन'कडून २००५ साली लिलावात खरेदी करण्यात आली. ही खरेदी राज ठाकरे - राजन शिरोडकर यांच्या 'मातोश्री इन्फ्रास्ट्रक्टर' आणि उन्मेष जोशी यांच्या 'कोहिनूर - सीटीएनएल' यांनी संयुक्तपणे ४२१ कोटींची बोली लावून खरेदी केली. 'सीटीएनएल' ही सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या 'आयएल एन्ड एफएस' या संस्थेचीच एक उपसंस्था आहे. अर्थात, 'कोहिनूर मिल'ची जागा मातोश्री-कोहिनूर आणि सीटीएनएल यांनी भागीदारीत विकत घेतली होती.
२१०० कोटींचा प्रकल्प
'आयएल एन्ड एफएस' पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वित्तपुरवठा करणारी संस्था आहे. 'कोहिनूर स्क्वेअर' उभारण्यासाठी 'आयएल एन्ड एफएस' या संस्थेकडून एकूण ८५० कोटींची गुंतवणूक करण्यात आली. 'कोहिनूर स्क्वेअर' हा तब्बल २१०० कोटी रुपयांचा अवाढव्य असा प्रकल्प आहे. दादरमध्ये शिवसेना भवनासमोरील ५२ आणि २५ मजल्यांचे असे दोन जुळे टॉवर 'कोहिनूर स्क्वेअर' म्हणून ओळखले जातात. या इमारतीच्या खालच्या १५ मजल्यांवर पार्किंगची आखणी आहे. तर मुख्य इमारतीच्या पहिल्या पाच मजल्यांवर शानदार शॉपिंग मॉल्स उभारले जाणार आहेत. तर ४७ मजल्यांवर सिंगापूर ब्रँडचं 'द आयू मुंबई' हे फाईव्ह स्टार हॉटेल मुंबईकरांना दिसणार आहे.
सरकारी कंपनीला तोटा?
परंतु, २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सोसत 'कोहिनूर - सीटीएनएल' या कंपनीने आपले समभाग केवळ ९० कोटी रुपयांना विकले. समभाग विकल्यावरही 'आयएल एन्ड एफएस'ने 'कोहिनूर स्क्वेअर' या इमारतीसाठी आगाऊ कर्ज देत पुन्हा एकदा गुंतवणूक केली. यामध्ये सरकारी कंपनी 'आयएल एन्ड एफएस'ला मोठा तोटा सहन करावा लागल्याची संशय अंमलबजावणी संचलनालयाला आहे.
राज ठाकरेंनी किती फायदा झाला?
२००८ साली राज ठाकरे यांनी या कंपनीतील आपले समभाग विकून टाकले. या व्यवहारात राज ठाकरेंनी किती फायदा झाला? याचीदेखील माहिती ईडीच्या तपासात समोर येईल.
...तरीही 'कोहिनूर'ला कर्ज
२०११ मध्ये 'कोहिनूर सिटीएनएल' कंपनीने आपली काही मालमत्ता विकून ५०० कोटींच्या कर्जाचा परतावा करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. या करारानंतर 'आयएल एन्ड एफएस'नं 'कोहिनूर'ला १३५ कोटींचं कर्ज दिल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी याआधीच ईडीने 'कोहिनूर सीटीएनएल'च्या एका बड्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला आहे.
उन्मेष जोशी यांनी या व्यवहारासाठी विविध वित्त संस्थांकडून कर्ज घेतले होते. या थकित कर्ज प्रकरणी वित्तसंस्थांनी 'नॅशनल लॉ ट्रिब्युनल'कडे धाव घेतली. ट्रीब्युनलनं हा प्रकल्प प्रभादेवीच्या 'संदीप शिक्रे एन्ड असोसिएटस'कडे सोपवला... आणि त्यामुळे उन्मेष जोशी यांना या प्रकल्पावर पाणी सोडावं लागलं.
गुरुवारी राज ठाकरेंची चौकशी
दरम्यान, 'कोहिनूर स्केअर' प्रकरणी उन्मेष जोशींच्या चौकशीचा आजचा सलग तिसरा दिवस आहे. उन्मेष हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पुत्र आहेत. तसंच राजन शिरोडकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. शिरोडकरांकडे कोहिनूरसंदर्भातल्या काही कागदपत्रांची मागणी ईडीनं केलीय. उद्या अर्थात गुरुवारी 'कोहिनूर मिल'च्या खरेदीदारांपैंकी एक असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही ईडीनं चौकशीसाठी बोलावलंय.