मुंबई : मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाल्यानं आता महाराष्ट्रातली ऑपरेशन लोटस सुरु होईल आणि ठाकरे सरकार गडगडेल अशी चर्चा सुरु झाली. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची मोट बांधणाऱ्या शरद पवार यांनी यावर प्रथमच भाष्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत राज्यसभेची उमेदवारी दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींवर पवारांना प्रश्न विचारले गेले. तसंच मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही परिस्थिती उद्भवेल का ? असा प्रश्नही पवारांना विचारण्यात आला. तेव्हा, 'महाराष्ट्रात असं काहीही होणार नाही. मला जी माहिती आहे त्यानुसार या राज्यात अशी स्थिती येणार नाही. पाच वर्षे हे सरकार चालेल', असं उत्तर पवारांनी दिलं. मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीबाबत कमलनाथ यांच्यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला.


मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींवर पवार काय म्हणाले?


मध्य प्रदेशमधील घडामोडींवरही पवारांनी भाष्य केलं. 'कमलनाथ यांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे. ते चमत्कार करू शकतात असं लोकांना वाटतं. बघुया दोन दिवसांत काय होतं ते....,' असं पवार म्हणाले. मुख्यमंत्री कमलनाथ विश्वासदर्शक ठराव जिंकतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.


मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरून पत्रकारांनी पवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली. 'काँग्रेसमध्ये नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि भविष्य देखिल आहे, असं पवार म्हणाले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संघटनेत जबाबदारी द्यावी अशी काँग्रेसमध्ये परंपरा आहे म्हणे', असा टोलाही पवार यांनी लगावला.


मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर पवारांची प्रतिक्रिया


राज ठाकरे यांनी मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर केल्यानंतर त्यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. 'मनसेचा शॅडो कॅबिनेटचा प्रयोग चांगला आहे. राज्य सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा केली असेल तर चुकीचं नाही. काहीतरी आपण करतोय हे दाखवण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे', असं शरद पवार म्हणाले.


मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत