मुनगंटीवार यांनी सोनाराचा धंदा कधी सुरु केला? अनिल परब यांचं प्रत्युत्तर
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे
मुंबई : भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची 24 कॅरेटची शिवसेना राहिलेली नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना नेते अनिल परब यांनी जशाच तसं उत्तर दिलं आहे.
अनिल परब यांचं जशास तसं उत्तर
सुधीर मुनगंटीवार यांनी सोनाराचा धंदा कधीपासून सुरु केला? असा सवाल उपस्थित करत अनिल परब यांनी सुधीर मुनगंटावर यांना आपण राजकारणी आहोत, राजकारण करावं, कॅरेटबिरेट तपासण्याचं काम मुनगंटीवार यांचं नाही, असं सुनावलं आहे.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
या दोन वर्षात राज्यात 3 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, कोरोना काळात हा शेतकरी कष्ट करत होता तरीही त्याला मदत करत नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर 25 हजार प्रती हेक्टर मदत देण्याचं आश्वासन दिले. क्या हुआ तेरा वादा? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. अशा विपदा परिस्थिती केवळ 3 हजार कोटी खर्च करतात, पण आण असा आणतात की तुम्हीच शेतकऱ्यांचे कर्तेधर्ते आहे, असा टोला शरद पवार यांचं नाव न घेता लगावला.
बाळासाहेबांची शिवसेना बदलली
बाळासाहेब ठाकरे यांची 24 कॅरेट शिवसेना होती ती आता बदलली आहे. एक दादरा नगर हवेली जिकली पण ती देखील स्वतःच्या नावाने जिकली का? असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. आधीच राज्यात एक पंतप्रधान होण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत आता हे दुसरे असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
राज्याचे गृहमंत्री नामधारी
मंत्रालय जनतेची सेवा करणारं केंद्र आहे, पण तिकडे दारूच्या बाटल्या सापडल्या, अजून या बाटल्या कोणी आणल्या ते कळलं नाही. मिलिंद नार्वेकर यांना वॉट्स अपवर धमकी आली पण अजून सापडला नाही असं सांगत नामदारी गृहमंत्री वेगळे आहेत कामधारी दुसरे आहेत असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लगावला.