मुंबई : वेळ संध्याकाळची. पांडुरंग बुधकर मार्गावर वाहनांची लगबग आणि गर्दी. पावसाची रिपरिप सुरु होती. त्यात बेस्टची १६७ क्रमांकाची बस रस्त्याच्या मध्यभागी बंद पडली. यामुळे नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना कराव्या लागणाऱ्या या मार्गावर आज अधिकच भर पडली. जवळपास १५ मिनिटे बस जाग्यावर उभी होती. धक्कामारुन बस सुरु झाली खरी मात्र, २० ते २५ मिनिटे ट्राफिक जामचा सामना सर्वांनाच करावा लागला. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बेस्टची सीएनजीवरील १६७ क्रमांकाची बस मधु इंडस्ट्रीयल इस्टेटच्या थोडी पुढे बंद पडली. बस सुरु करण्याचा चालकाने आटोकाट प्रयत्न केला. मात्र, १५ मिनिटे झाली तरी बस जाग्यावरुन हलेनाच. बसच्या पाठिमागे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. दीपक टॉकीजपर्यंत वाहतूक कोंडी वाढत गेली. त्यानंतर लगेच ट्राफिक पोलीस घडनास्थळी दाखल झाले. त्यांनीही प्रयत्न केले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तोपर्यंत वाहनांच्या रांगा वाढत गेल्यात. शेवटी बस वाहक, ट्राफिक पोलीस आणि अन्य काहींनी बसला दे धक्का सुरु केला.  बस हलविण्यात त्यांना यश आले. परंतु १५ ते २० मिनिटांच्या कालावधीत वाहनांच्या रांगा वाढल्याने वाहतूक कोंडी २५ मिनिटे कायम होती.



दरम्यान, पांडुरंग बुधकर मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजुला पे पार्किंग सुरु आहे. तसेच या मार्गावर नव्याने पब सुरु झालेत. त्यामुळे येथे नेहमीच वाहनांची वर्दळ सुरु असते. रस्त्यावर गाड्या पार्किंग करण्यात येत असल्यामुळे येथे वाहतूक कोंडीचा नेहमी सामना करावा लागतो. येथे ट्राफिक पोलीस वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी पडत आहेत. आज १६७ बस बंद पडल्यानंतर प्रत्यय दिसून आला आणि वाहतुकीची तीव्र समस्या पादचाऱ्यांना सहन करावी लागली.


बेस्टचा भोंगळ कारभार



कुरणे चौक ते एलफिस्टन मार्गावर १६७ क्रमांची बस सेवा सुरु आहे. मात्र, गाड्या अनेकवेळा वेळेवर नसतात. त्यामुळे याचा लाभ खासगी टॅक्सी वाहतुकीने उचलाय. एलफिस्टन बस थांब्यावर २० ते ३० मिनिटे बस येत नाही. अनेक वेळा दोन ते तीन बस एकापाठोपाठ येतात. मात्र, गाड्या थांबवून न ठेवता, लगेच सोडल्या जातात. अनेकवेळा प्रवासी धावत पळत बस पकतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. बरेचवेळा प्रवाशांचे चालकाशी भांडणही होते. त्यावेळी चालक-वाहक सांगतात आम्हाला बस फेऱ्या मारण्याचे आमचे टार्गेट पूर्ण करायचे असते. त्यामुळे बस लगेच सोडण्यात येते. यामुळे बसला प्रवाशी कमी आणि खासगी वाहतुकीला प्रवासी जास्त, असेच चित्र दिसून येत आहे. या प्रकाराला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


 


दरम्यान, एलफिस्टन रोड थांबा ते पोलीस चौकी दरम्यान रस्ता काम करण्यात येत होते. त्यावेळी बेस्टची बस वाहतूक इंडिया बुल्स इमारतीपर्यंत सुरु होती. मात्र, खासगी टॅक्सी वाहतूक सुरु होती. बस बंदचा लाभ शेअर टॅक्सीने उचलला. टॅक्सीचे ८ रुपयांचे भाडे १० रुपये करण्यात आले. टॅक्सी चालकांनी मनमानी करत ही भाडेवाढ केली. आता पूर्ववत बस वाहतूक सुरु झाली असली तरी वेळेत गाड्या नाही. ८ रुपये बसचे भाडे असले तरी याचा लाभ शेअर टॅक्सीने उचलाय, याला बेस्टचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय.