Corona लसीचा तिसरा डोस कधी घ्यावा ? भारत बायोटेकचे अध्यक्षांनी दिली माहिती
कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ही तिसरा डोस घेण्याची गरज आहे का? यावर भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
मुंबई : कोरोनावरील लस (corona vaccine) उपलब्ध झाल्यानंतर भारतात लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पूर्ण झाला आहे. आतापर्यंत अनेकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यातच आता कोरोनाच्या बुस्टर डोसची (booster dose) देखील चर्चा सुरु आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ही तिसरा डोस घेण्याची गरज आहे का? यावर भारत बायोटेकचे (Bharat Biotech) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
बुधवारी त्यांनी म्हटले की, तिसरा डोस हा दोन्ही डोस घेतल्यानंतर पुढील सहा महिन्यांनंतर द्यावा, ही सर्वात योग्य वेळ आहे. त्याचबरोबर त्यांनी नाकातील लसीचे महत्त्वही सांगितले. झिकाविरोधी लस बनवणारी त्यांची कंपनी जगातील पहिली कंपनी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
भारत बायोटेक देखील "बूस्टर" डोस म्हणून नेजल वॅक्सीन (nasal vaccine) सादर करण्याचा विचार करत आहे. नेजल वॅक्सीनचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, संपूर्ण जगाला अशा प्रकारच्या लसी हव्या आहेत. संसर्ग टाळण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येकजण "इम्युनोलॉजी" शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि सुदैवाने, भारत बायोटेकने ते शोधून काढले आहे. झिकाविरोधी लसीबाबत कृष्णा एल्ला म्हणाले की, भारत बायोटेकने झिका विषाणूविरोधी लस विकसित केली आहे. चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. प्रकरणे अधिक असल्याने सरकारला अधिक चाचण्या कराव्या लागतील.
ते म्हणाले की, '2014 मध्ये आम्ही झिका विरोधी लस बनवणारी जगातील पहिली कंपनी होतो. झिकाविरोधी लसीसाठी जागतिक पेटंटसाठी अर्ज करणारे आम्ही पहिलेच होतो. कृष्णा एल्ला यांनी एका मीडिया हाऊस कार्यक्रमात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची "कोव्हॅक्सीन" लस त्यांचा भारतीय विज्ञानावरील विश्वास दर्शवते. दुसरा डोस दिल्यानंतर सहा महिन्यांनीच तिसरा डोस द्यावा. तिसऱ्या डोससाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.'