मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर अजूनही योग्य तोडगा निघालेला दिसत नाही. शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. तसेच त्यांनी सेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. राऊत यांच्या भाषेमुळे शिवसेना आणि भाजपत अधिक दरी निर्माण झाली असे केसरकरांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्ही वेगळी भूमिका घेतल्यानंतर अनेक कायदेशीर बाबी समोर आल्या. त्या आता न्यायालयात असल्यामुळे काही अंशी सुटल्या आहेत. काही अंशी बाकी आहेत. त्यामुळे पुढील रणनितीवर आम्ही काम करीत आहोत. रणनिती ही उघड करायची नसते. नाहीतर ती रणनिती राहत नाही. सध्या मानसिक द्वंद्व सुरू आहे. शिवसैनिकांमध्ये गैरसमज पसवण्याचं काम सुरू आहे. आम्ही त्यांना समजावण्यात नक्की यशस्वी ठरू' असे केसरकरांनी म्हटले आहे. 


'आमची अजुनही उद्धव साहेबांना विनंती आहे. की राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आपले कायमस्वरूपी मित्र असू शकत नाही. त्यांच्या विचारधारेचा आमच्या विचारधारेशी संबध नाही. समान विचाराचे लोकांची मैत्री जास्त काळ टिकते.नक्कीच भाजप आणि आमच्यात काही विषयांवर मतभेद असतील, परंतू हे सुधारता येते. मी उद्धव ठाकरे साहेबांना शेवटचं आवाहन करतोय. आमचं प्रेम आहे मातोश्रीवर! राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आघाडीतून बाहेर पडावं.' असे आवाहन पुन्हा एकदा केसरकरांनी केले आहे.


'आपण निवडणुकीला सामोरे गेलो तेव्हा युती म्हणून लोकांना मतं मागितली. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि राहणार. आम्ही 4 ते 5 दिवसांत आम्ही महाराष्ट्रात येऊ...' अशी मोठी माहिती केसरकरांनी 'झी24तास'शी बोलतना दिली.