कृष्णात पाटील / सचिन गाड, झी मिडीया, मुंबई : छगन भुजबळ सध्या केईएम रुग्णालयातील ४३ नंबरच्या वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. इथल्या ग्रॅस्ट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ कंथारिया हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. जामीन मिळाल्याची बातमी समजल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते रुग्णालयात येत असले तरी पोलिस बंदोबस्त असल्यानं त्यांना भेटता येत नाही. सकाळी थोडं तणावात असलेले भुजबळ जामीन मिळाल्याचा निकाल कळाल्यानंतर आनंदात असल्याचं समजलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन वर्षांनी अखेर महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजुर झाला आहे. पीएमएलए कायद्यातील कलम ४५ सुप्रिम कोर्टाने रद्द केल्यानंतर भुजबळांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला होता.  
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि राज्य़ाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. २ वर्षांनी  भुजबळांना जामीन मंजुर करण्यात आल्याने शुक्रवारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कुठे मिठाई वाटली जात होती तर कुठे फटाके फोडण्यात येत होते. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाऊंड्रींग प्रकरणी १४ मार्च २०१६ ला छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर भुजबळांनी सेशन्स कोर्टात तसेच मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अनेक अर्ज केले पण नेहमीच त्यांच्या पदरी निराशा आली होती. यावेळी जामीन देताना कोर्टांने काही अटीदेखील घातल्या आहेत.
 
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलीना येथील जमीन प्रकरणात मनी लाऊंड्रिंग केल्याचा ठपका ठेवत छगन भुजबळांना पीएमएलए अंतर्गत अटक करण्यात आली होती. या कायद्यातील कठोर तरतुदींमुळे भुजबळांना जामीन मिळणे अशक्य होऊन बसले होते. मात्र नव्हेंबर महीन्यात सुप्रिम कोर्टांने या कायद्यातील ४५(१) कलम रद्द ठरवल्यानंतर छगन भुजबळांच्या जामीनाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.  


राजकीय हेतूने ही अटक झाल्याचा आरोप स्वत: छगन भुजबळ यांनी केला होता. त्यामुळे दोन वर्षांनी बाहेर आल्यानंतर भुजबळ नेमका कोणावर निशाणा साधतात, हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.