Amruta Fadnavis Blackmail Case: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी देण्याच्या आरोपात मुंबई पोलिसांनी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) हिला अटक केली आहे. अनिक्षा जयसिंघानीला 21 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबई सेशन कोर्टानं अनिक्षाला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) यांची मुलगी आहे. अमृता फडणवीस यांनी अनिक्षाबरोबर तिचे वडिल अनिल जयसिंहानी यांच्याविरोधाताही तक्रार दाखल केली आहे. अनिल जयसिंहानी हा 5 राज्यात वॉन्टेड आहे, इतकंच नाही तर 8 वर्षांपासून तो फरार असल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे प्रकरण?
अमृता फडणवीस यांनी गेल्या महिन्यात 20 तारखेला डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडिल अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. अनिक्षाविरोधात लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. अमृता फडणवीस यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार अनिक्षा नावाची महिला 2021मध्ये भेटली. आपण एक डिझायनर असून पब्लिक इव्हेंटमध्ये आपण डिझाईन केलेले कपडे आणि ज्वेलरी परिधान करावी, जेणेकरुन त्याचं प्रमोशन होईल असा आग्रही तीने धरला. 


'एक कोटी लाच देण्याचा प्रयत्न'
विश्वास संपादित केल्यानंतर त्या मुलीने अमृता यांना माझ्या वडिलांना एका प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही त्यांना सोडवा अशी विनंती केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. अनिक्षा जयसिंघाने या मुलीने आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देऊ असं अमृता यांना सांगितलं. यानंतर एका अनोळखी क्रमांकावरुन काही व्हिडीओ आणि क्लिप आल्या. यातल्या एका व्हिडीओमध्ये ही मुलगी एका बॅगेत पैसे भरताना दिसत होती. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तशीच बॅग त्या मुलीने आमच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला देण्यात आल्याचे दाखवण्यात आलं. त्यानंतर तीने धमकी दिली हे व्हिडीओ टाकले तर तुमच्या पतीची नोकरी धोक्यात येईल. माझे सगळ्या पक्षांसोबत संबंध आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा' अशी माहिती फडणवीस यांनी दिली.


कोण आहे अनिल जयसिंहानी?
अनिल जयसिंघानी हा मोटा बुकी असून तो उल्हासनगरमध्ये राहातो. 5 राज्यात 17 गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. गेल्या 8 वर्षांपासून तो फरार आहे. सट्टेबाजी प्रकरणात अनिल जयसिंहानीला तीन वेळा अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही तर गोवा पोलिसांनी 11 मे 2019 रोजी अनिल जयसिंघानी याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली होती. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार आठ वर्षांपूर्वी 2015 मे मध्ये गुजरात ईडीने जयसिंहानी याच्या दोन घरांवर छापा मारला होता. त्याच्याविरोधात मनी लॉण्ड्रींग प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला. पण तब्येतीचं कारण देत तो फरार झाला. त्यानंतर मुंबईतल्या दोन पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवूणीकाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


अनिल जयसिंघानी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्याही रडारवर आहे. अनिल जयसिंहानी उल्हासनगरमध्ये क्रिकेट बुकी म्हणून काम करत होता. अहमदाबाद सेशन कोर्टानेही त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केलं आहे. गुजरात इडीव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, आसाम, मध्यप्रदेशमध्येही त्याच्या शोध सुरु आहे.