मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या ६३ वर्षीय वृद्ध रुग्णाचा kovid19 कोरोना व्हायरसनं मृत्यू झाल्यानंतर राज्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. या रुग्णाला उच्च रक्तदाब, न्यूमोनिया आणि हृदय़ाचे ठोके वाढल्याने मृत्यू झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. पण याला रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं देखील रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. याआधी भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले कर्नाटक आणि दिल्लीतील दोन रुग्णही वृद्धच होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेले काही दिवस उपचार सुरु असलेल्या ६३ वर्षीय रुग्णाला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातून कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी दुबई येथून आल्यानंतर या रुग्णाला खोकला, ताप असा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे आधी हिंदुजा रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरु करण्यात आले होते. पण शुक्रवारी १३ मार्च रोजी हिंदुजा रुग्णालयात असतानाच या रुग्णाला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचं लक्षात आलं आणि या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


दुबईतून आलेला हा रुग्ण ६३ वर्षांचा वृद्ध होता. तरुण रुग्णांची प्रतिकार शक्ती अधिक असल्यानं कोरोना व्हायरसचा प्रतिकार ते सहज करतात. तरुणांप्रमाणे प्रतिकार शक्ती वृद्ध रुग्णांमध्ये नसते, त्यामुळे कोरोनाग्रस्त वृद्ध रुग्णांची अधिक काळजी घ्यावी लागते. शिवाय कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाला अन्य आजारही होते. कोरोना बाधित आढळल्यानंतर या रुग्णावर कस्तुरबा रुग्णालयात चार दिवस उपचार करण्यात आले. पण सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.


रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचं विलगीकरण


हिंदुजा रुग्णालयात या रुग्णाला कोरोना व्हायरस झाल्याचं लक्षात आल्यानंतर उपचारादरम्यान या रुग्णाच्या सहवासात आलेल्या डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी अशा सुमारे १०० जणांची कोरोना चाचणी करून त्यांना वेगळं ठेवण्यात आलं आहे.


या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह असल्याचं समजतं. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तिंना वेगळं ठेवण्यात आलं आहे. या रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात वेगळं ठेवण्यात आलं आहे. तर रुग्णाशी काहीसा दुरून संपर्क झालेल्या अन्य व्यक्तींना घरीच वेगळं ठेवण्यात आलं आहे.