शिवसेनेच्या राशीला `चार R`चं ग्रहण, SS विरुद्ध `RRRR` युद्ध पेटलं
`चार R` सध्या शिवसेनेच्या राशीत कुंडली मारून बसले आहेत, पाहा कोण आहे ते `चार R`
Maharashtra Politics : RRR नं बॉलिवूडचा पडदा गाजवला. आता महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पडद्यावरही सध्या R फॅक्टर गाजतोय. सत्ताधारी शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सध्या चारही बाजूंनी RRRR नं घेरलं आहे.
कोण आहे पहिला R
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चुलत बंधू आणि मनसेचे प्रमुख. येत्या 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत तर महाआरती सुरू करण्याचा अल्टीमेटम त्यांनी उद्धव ठाकरे सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पोलिसांची जोरदार फिल्डिंग लावलीय. मनसे आणि भाजपची वाढती जवळीक हा देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.
दुसरा R राणा दाम्पत्य
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी शिवसेनेला खुलं चॅलेंज दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. त्यावरून राणा विरुद्ध सेना असा संघर्ष पेटला आहे. राणांना रोखण्यासाठी मातोश्रीबाहेर शुक्रवारपासूनच शिवसैनिकांनी ठिय्या दिलाय. तर गनिमी काव्यानं मुंबईला पोहोचलेलं राणा दाम्पत्य शनिवारी हनुमानाच्या वाराला शिवसेनेत किती दम आहे, हे आजमावणार आहेत.
तिसरा R राणे पितापुत्र
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली काढण्याची भाषा केली आणि राणे विरुद्ध सेना संघर्ष पेटला. ठाकरे सरकारनं राणेंना अटक केली. नितेश राणेंनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे यांना म्याव म्याव असं चिडवलं. आणि नितेश राणेंच्या अटकेचा खेळ रंगला. राणेंच्या मुंबईतल्या बंगल्यावर कारवाईच्या नोटिसा पाठवण्याचा कार्यक्रम अधूनमधून सुरूच आहे. दीर्घकाळ सुरू असलेला हा राजकीय सामना यापुढंही असाच रंगणार आहे.
पहा चौथा R कोण
चौथा R आहे, बॉलिवूडची बोलबच्चन अभिनेत्री कंगना रनौत. आपल्या धारदार शब्दांनी शिवसेनेला घायाळ करणारी पंगा क्वीन. शिवसेनेला शिंगावर घेताच तिच्या मुंबईतल्या घरातल्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेनं 'उखाड दिया' म्हणत बुलडोझर फिरवला. कंगना रनौतला थेट केंद्र सरकारनं वाय प्लस सुरक्षा दिली. त्यावरून तिचं महत्त्व लक्षात येईल.
हे चारही आर सध्या शिवसेनेच्या राशीत कुंडली मारून बसले आहेत. शिवसेना विरुद्ध चार आर अशी आरपारची लढाई आता सुरू झालीय.