मुंबईत कोसळलेलं विमान कोणाच्या मालकीचं?
घाटकोपरमध्ये कोसळलेलं विमान कोणाच्या मालकीचं?
मुंबई : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत विमानातील 4 जणांसह पादचारी व्यक्तीचा देखील मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. एका व्यक्तीला अत्यवस्थ अवस्थेत राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ३० प्रवासी क्षमता असलेलं हे चार्टर्ड विमान असल्याचं समजतं आहे. सी ९० प्रकाराचं हे चार्टर्ड विमान होतं. हे चार्टर्ड विमान जुहू इथून टेस्टिंगसाठी निघालं होतं. या विमानावर युपी सरकारचं नाव होतं त्यामुळे सुरुवातीला हे विमान युपी सरकारचं आहे का अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण युपी सरकारने स्पष्ट केलं आहे ते विमान त्यांचं नसून 2014 साली त्यांनी ते विकलं होतं. हे विमान दीपक कोठारी यांच्या मालकीचं असल्याचं कळतं आहे. दीपक कोठारी हे पान परागचे मालक आहेत.
विमान दुर्घटना झालं तेव्हा परिसरात मोठा स्फोटाचा आवाज झाला. काय झालं हे सुरुवातीला कोणालाच कळालं नाही. परिसरात आगीचे आणि धुराचे लोळ उठले होते. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली. या घटनेत मोठी जिवितहानी थोडक्यात टळलीय. घाटकोपरमधल्या भटवाडी या रहिवासी भागात हे विमान कोसळलं असतं तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु, हे विमान मैदानी भागात कोसळलं. या मैदानाच्या बाजुलाच एक महाविद्यालयही आहे.