नितेश राणेंचं आव्हान स्वीकारलं, राणेंच्या घरासमोर जाऊन घातला `राडा`; कोण आहे वरूण सरदेसाई?
वरूण देसाईंनी मुंबईत राड्याचा नारळ फोडला
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. नारायण राणेंच्या जुहू येथील घरासमोर मोठा राडा झाला. शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष वरूण सरदेसाई आक्रमक झाले. त्यांनी नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी दिलेलं आव्हान स्विकारलं. शिवसेनेचं आक्रमक रूप दाखवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. तर वरूण सरदेसाई नेमके कोण आहेत? ज्यांनी राणेंविरोधात मुंबईत चक्क रणशिंग फुंकलं आहे.
नितेश राणेंचं आव्हान
युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले होते. नितेश राणेंचं हे आव्हान वरूण सरदेसाई यांनी अंगावर घेत रणशिंग फुंकलं. मुंबईत शिवसेैनिक-भाजप कार्यकर्ते भिडले. पोलिसांना करावा लागला लाठीचार
कोण आहेत वरूण सरदेसाई?
वरुण सरदेसाई हे युवासेनेच्या सचिव आहेत. तसचे ते पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भगिनीचे ते पुत्र आहेत. वरुण यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदासह शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. वरुण सरदेसाई हे पेशाने सिव्हिल इंजिनिअर आहेत.
आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी प्रथम मागणी करणारे वरूण सरदेसाई
आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवाली अशी जाहीर मागणी सर्वप्रथम वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता. आज आदित्य ठाकरे मंत्रीपदावर आहेत त्यामागे वरूण सरदेसाई यांचा खूप मोठा वाटा आहे.
2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात होती. गेल्या वेळी मुंबई सिनेट निवडणुकीच्या युवासेनेच्या व्यूहरचनेत वरुण सरदेसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व 10 जागा जिंकून युवासेनेने विक्रम रचला होता.
वरूण सरदेसाईंची वाय प्लस दर्जाची सुरक्षा चर्चेत
राज्यातील महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र, त्याचवेळी वरुण सरदेसाई यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यावरुनही नितेश राणे यांनी शिवसेनेवर आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला होता.
वरूण सरदेसाई आणि नितेश राणे, राणे कुटुंबिय हा वाद जुनाच आहे. पण नितेश राणेंनी आज ट्विट करून दिलेल्या आव्हानाला वरूण सरदेसाईंनी प्रत्युत्तर दिलंय.