मुंबई :  रेल्वेच्या अखत्यारितील पूल लष्कराकडून का बांधून घेतले जात आहेत, असा सवाल करत विरोधकांकडून विचारले जात आहे. या विषयी  लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी लष्कराची बाजू मांडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लोकांना ज्यावेळी गरज असते, त्यावेळी लष्कर मदतीसाठी तत्पर असते, हा संदेश देण्यासाठी आम्ही एल्फिन्स्टन, करीरोड आणि आंबिवली येथील पूल बांधणार आहोत, लोकांच्या मनात असणारी लष्कराविषयीची प्रतिमा उंचावण्यासाठी रेल्वे पुलांच्या उभारणीचे काम स्वीकारले', असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले आहे.


लष्करप्रमुख म्हणतात, 'देशवासीयांच्या मनातील लष्कराबद्दलचा अभिमान आणखी वाढावा, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु असतात. मात्र यासोबतच जेव्हा देशातील नागरिकांना आमची गरज असते, त्यावेळी पूर्ण ताकदीने आम्हाला त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करायला आवडेल, आम्ही अनेकदा शहरी भागांमध्ये 'नो युअर आर्मी' नावाने कॅम्पचे आयोजन करतो.'


'निवृत्तीनंतर आमच्या अधिकारी आणि जवानांना चांगली नोकरी मिळवायची असल्यास शहरांमधील पूल उभारणीचा अनुभव त्यांना फायदेशीर ठरु शकतो. काही भागांमध्ये पूल उभारणीचे वेगाने पूर्ण करायचे असल्यास रेल्वे मंत्रालय निवृत्त अधिकारी आणि जवानांच्या 1-2 बटालियन तयार करु शकते. यामुळे रेल्वेला शिस्तबद्धपणे काम करणारे चांगले 


कर्मचारी मिळतील. या शिवाय कमीतकमी वेळेत रेल्वेची कामे पूर्ण होतील, सामान्य नागरिकांमध्ये जाऊन शहरांमध्ये काम केल्याचा अनुभव जवानांना निवृत्तीनंतर उपयोगी ठरेल', असेही लष्करप्रमुखांनी म्हटले.


'लष्कराच्या अभियंत्यांना युद्ध प्रसंगात जवानांना वेगाने पुढे सरकता यावे, यासाठी अनेक भागांमध्ये पुलांची उभारणी करतो. या बद्दलचा सराव अभियांत्रिकी विभागाकडून कायम केला जातो. मुंबईत उभारले जाणारे पूल हा याच सरावाचा भाग असेल. 


पुण्यातील मुळा, मुठा नदीवर पूल उभारणीचा सराव पेक्षाही हा सराव जवान मुंबईत येऊन करतील.  दोन्हीकडे कौशल्याची आवश्यकता असते. यामुळे जवानांचे कौशल्य देशवासीयांच्या कामी येईल, 'मुंबईत पूल बांधायला येणाऱ्या जवानांच्या प्रशिक्षणात खंड पडणार नाही, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.