अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : दुसऱ्याच्या वहाणेनं विंचू मारणं, अशी एक म्हण आहे. सध्या मुंबईमध्ये काँग्रेस - मनसेमध्ये जो वाद सुरु आहे त्याला ही म्हण तंतोतंत लागू पडते. कारण मनसे - काँग्रेसच्या वादात भाजप स्वतःचा फायदा शोधत आहे.


मनसे - काँग्रेस वादात भाजपंचे मौन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एल्फिस्टन रेल्वे स्थानकाबाहेर हकनाक २३ प्रवाशांचे  बळी गेले. त्यानंतर फेरीवाले प्रकरणावरून राजकारण सुरु झालं आणि या वादात आता मनसेनं मुंबई काँग्रेसचं कार्यालय फोडलं आहे. या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी काँग्रेसनं केलीय. मात्र, काँग्रेसनं सत्तेत असताना जे केलं तेच आता सत्तेत असलेली भाजप करत आहे, हे काँग्रेस बहुदा विसरली असावी. गृहखातं हातात असल्यानं भाजप मनसेला मोठं करायला बघत असतानाच शिवसेना अस्वस्थ कशी होईल, याची वाट पाहत आहे. या सर्व प्रकरणामध्ये भाजप सोईस्कर मौन बाळगून आहे.


सेनेला डिवचण्यासाठी?


- मुंबईत मनसे - काँग्रेसमधील वाद जोरात आहे


- उठसुठ ट्विटर, वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया देणारे भाजप नेते, प्रवक्ते शांत आहेत


- भाजपचा काठावर उभं राहून राजकीय लाभाच्या मासेमारीचा प्रयत्न आहे


- सध्या मुंबई आणि परिसरात मनसेची जोरदार चर्चा आहे


- मनसेची वृद्धी म्हणजे शिवसेनेच्या मतांमध्ये घट होणार


- मुंबईत मराठी मते भाजपाला मिळत नाहीत


- मराठी मते विभागली जाणं भाजपसाठी फायद्याचं आहे


मतदारांनो, हे पाहताय ना...


अर्थात मनसेला या सर्व वादामुळे संजीवनी मिळाली असली तरी काँग्रेसला फायदा होणार का? हा खरा प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांमुळे हिंदी भाषिक मतपेढीवर तयार झालेली घट्ट पकड सुटणार नाही, तसंच ती पुन्हा काँग्रेसकडे वळणार नाही, याकडे भाजप काटेकोरपणे लक्ष ठेवून आहे. उलट आता शांत बसत काँग्रेस - मनसेमधील वाद आणखी वाढतो का याची भाजप वाट बघत आहे.