मुंबई : राज्यात आज आणखी एका मोठ्या बातमीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीवर आज ईडीने कारवाई केली. अंमलबजावणी संचालनालायने (ED) केलेल्या कारवाईनंतर महाविकासआघाडीतील नेत्यांनी ही कारवाई सूडापोटी केली जात असल्याची टीका केली. तर काही चुकीचं केलं नसेल तर डर कशाला अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर आज ED ने कारवाई केली. पण हे संपूर्ण प्रकरण काय आहे. हे जाणून घेऊया. ठाण्यात शास्त्रीनगर भागात नीलांबरी हा गृहनिर्माण प्रकल्प पुष्पक बुलियन या कंपनीने उभारला आहे. पुष्पक बुलियन ही कंपनी पुष्कक ग्रुपचाच एक भाग आहे. नीलांबरी या गृहप्रकल्पात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड (Saibaba Grihanimiti Pvt Ltd ) या कंपनीच्या 11 सदनिका आहेत. श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे. त्यामुळेच श्रीधर पाटणकर यांच्या सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत.


पुष्पक बुलियन कंपनीच्या विरोधात 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कंपनीची 22 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या कंपन्यातील काही फंड हे वेगवेगळ्या फर्ममध्ये वळवण्यात आला आहे. ईडीचे अधिकारी यातील डीलर नंदकिशोर चतुर्वेदीपर्यंत पोहोचली. यानेच अनेक शेल कंपन्यांच्या मार्फत पैसे वळवल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आलं. पुष्पक ग्रुपच्या पुष्पक रिअॅलिटी या फर्ममधून नंदकिशोर चतुर्वेदी याच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले होते. चतुर्वेदीच्या मार्फत त्यानंतर M/s Humsafar Dealer Private Limited या कंपनीने सुमारे 30 कोटी रुपयांचे कर्ज साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेडला दिल्याचे कळले. त्यामुळे या कंपनीच्या 11 सदनिका ईडीने ताब्यात घेतल्या.