Sanjay Raut : कोणत्या प्रकरणात ईडीची कारवाई, किती संपत्ती जप्त? वाचा...
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोणत्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली? एकूण किती कोटींची ही संपत्ती आहे?
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या संपत्तीवर ईडीकडून टाच आणण्यात आली आहे. अलिबागमधील (Alibaug) आठ प्लॉट आणि दादरमधील (Dadar) फ्लॅटवर ईडीने (ED) जप्तीची कारवाई केली आहे. संजय राऊत यांनी मनी लॉन्ड्रींगमधल्या पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीने दिली आहे. पण हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊया
नेमकं प्रकरण काय आहे?
गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला (Guru Ashish Construction Pvt LTD) 672 भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी पत्रा चाळ प्रकल्पाच्या (Patra Chawl Project) विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संबंधित काळात राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत हे गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते.
सोसायटी, म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला. पण गुरू आशिष कन्स्ट्रक्शन्सच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 9 विकासकांना एफएसआय (FSI) विकून अंदाजे 901.79 कोटी रुपये 672 विस्थापितांसाठी वसूल केले.
पुढे गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने मीडोज नावाचा एक प्रकल्प सुरू केला आणि फ्लॅट खरेदीदारांकडून सुमारे 138 कोटी रुपयांचं बुकिंग घेतलं. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी बेकायदेशीर कृत्यांमधून केलेल्या गुन्ह्याची एकूण रक्कम अंदाजे 1039.79 कोटी इतकी आहे. गुन्ह्याच्या कमाईचा काही भाग जवळच्या सहकाऱ्यांना हस्तांतरित करण्यात आला.
आतापर्यंत तपासात काय समोर आलं?
आतापर्यंत केलेल्या मनी ट्रेल तपासात असं समोर आले आहे की एचडीआयएलकडून (HDIL) प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. ही रक्कम प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली होती.
1034 कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत निकटवर्तीय प्रवीण राऊत याला ईडीने अटक केली. 2010 मध्ये गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी 55 लाख रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाल्याचंही उघड झालं आहे. वर्षा राऊत संजय राऊत यांच्या पत्नी आहेत.
किती संपत्ती जप्त
वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांची ११ कोटी १५ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. प्रवीण राऊत यांची पालघर, सफाळे, पडगामधील जमीन जप्त करण्यात आली आहे.
वर्षा संजय राऊत यांचा दादरमधील प्लॅट आणि अलिबागमधील किहीम बीचजवळची जमीन जप्त करण्यात आली आहे. किहीम बीचजवळची जमीन ही वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर आहे.