मुंबई : महाविकास आघाडीतल्या नेते आणि मंत्र्यांविरोधात सातत्याने ईडी आणि सीबीआयची कारवाई केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा सीबीआयने ताबा घेतलाय. या कारवायांवर मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी जोरदार टीका केली आहे. 
 
ज्यांच्याविरुध्द कारवाई व्हायला लागली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही लोकांनी सांगितलं आता शांत झोप येते. हे जे काय आहे हा रडीचा डाव आहे. राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने करा. सरकार आली सरकार गेली. १९९५ मध्ये आमची सत्ता गेली, आम्ही विरोधी पक्षात काम केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारण जे काही घडलं त्यामुळे पुन्हा आमची सत्ता आली. सरकारच्या त्रुटी तुम्ही दाखवा, पण तुम्ही पर्सनल अटॅक करता, आरोप करता आणि सांगता सिद्ध करा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.


संजय राऊत यांनी कितीही सांगितलं हा माझा कष्टाचा पैसा आहे, यात कुठेही मनी लॉन्ड्रींग झालेलं नाही. पण ऐकतं कोण, तुम्ही एकदा त्याच्यावर ईडीची शिक्का मारला, की ते त्यांच्या पद्धतीने म्हणजे जसा उस आपण चिपाड करुन टाकतो तसं माणसालासुद्धा पिळवटून टाकण्याचं काम या ईडीच्या माध्यमातून केला जात आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे. 


सुप्रीम कोर्टानेही म्हटलं आहे की यंत्रणांचा वापर अवास्तव होता कामा नये, असं सांगितल्यानंतर सुद्धा केवळ नामोहरण करायचं काम सुरु आहे. 


तीन वर्ष गेली आणखी दोन वर्ष राहिली थांबा ना, आम्ही काय चुकीचं केलं असेल तर जनता तुम्हाला निवडून देईल. पण तुम्हाला थांबण्याची ही सवड नाही. हे ठिक आहे असं मला वाटत नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.


कायद्याने केव्हा उत्तर द्यायचं, जेव्हा ईडीची कारवाई संपेल, त्यानंतर कोर्टात उभं राहयचं, ते कधी वर्ष दोन वर्षांनी येईल. तोपर्यंत कारण नसताना अडचणीत राहायचं. 


दुसरा मार्ग एकच आहे तो म्हणजे मीडियाच्या माध्यमातून आम्ही दोषी नाही आणि कसं चुकीचं आहे हे सांगणं आणि जनतेपर्यंत जाणं हा एकच मार्ग आहे. 


तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने लढा, जनतेमध्ये जा, पण जिंकण्यासाठी समोरच्या पक्षातील नेत्यांना नेस्तनाबूत करण्याचा हा जो कार्यक्रम ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून सुरु आहे तो थांबवा, असं छगन भुजबळांनी सांगितलं. 


लोकांना हे कळतंय कशा प्रकारे अन्याय चालला आहे. लोकं मनात ठेवतात आणि निवडणुकीच्यावेळी बाहेर काढतात. तुम्हाला लढायचं असेल तर राजकारणाच्या मैदानावर लढा, ईडी, सीबीआयच्या पाठिमागे राहून लढू नका असं आव्हानही छगन भुजबळ यांनी दिलं आहे.