सत्तेत राहूनही भाजपला विरोध का? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर...
सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचं काम करताना दिसते... मग शिवसेनेला सत्तेत राहण्याचं कारण काय? सत्तेतून बाहेर पडा... अशा अनाहून सल्ल्यांनाही उद्धव ठाकरेंनी शिवसेना मेळाव्यातील आपल्या भाषणात उत्तर दिलंय.
मुंबई : सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचं काम करताना दिसते... मग शिवसेनेला सत्तेत राहण्याचं कारण काय? सत्तेतून बाहेर पडा... अशा अनाहून सल्ल्यांनाही उद्धव ठाकरेंनी शिवसेना मेळाव्यातील आपल्या भाषणात उत्तर दिलंय.
सत्तेत राहुनही शिवसेना सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करतेय... सत्तेत रमणं वेगळं आणि सत्ता राबवणं वेगळं... आम्ही गोरगरिब जनतेसाठी सत्ता राबवतोय, असं प्रत्यूत्तर पक्षप्रमुखांनी विरोधकांना दिलंय.
नोटाबंदीविरोधातही पहिल्यांदा शिवसेनेनंच आवाज उठवला होता... त्यानंतर आता सर्व जण नोटाबंदी विरोधात बोलून लागलेत... आम्ही अडानी... आणि बाकी सगळे अदानी, असा टोलाही त्यांनी यावेळी मारलाय.
आम्हाला भाजपसोबत सत्तेत का? असा प्रश्न विचारला जातो... पण, मला भाजपला विचारायचं की काश्मीरमध्ये मुफ्ती आणि त्यांच्या मुलीच्या खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही सध्या सत्ता भोगत आहात... विचारांची नाळ कुठे जुळते का? असा सवालही उद्धव ठाकरेंचा भाजपला विचारलाय. काश्मीरमध्ये सत्तेसाठी भाजपची लाचारी दिसतेय, असंही त्यांनी म्हटलंय.
हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना आणि भाजप एकत्र आले याचा पुनरुच्चार करत 'आम्ही आमचा झेंडा भगवाच ठेवलाय... तो कधीही बदलणार नाही... २५ वर्ष शिवसेनेनं भाजपचे चाळे खपवून घेतले आता मात्र नाही' असंही ते म्हणालेत.
शिवसेना भाजपच्या धोरणाला मुद्देसूद विरोध करत असते असं सांगताना 'जीएसटीच्या वेळी शिवसेनेने भूमिका लावून धरली नसती तर मुंबईसह २७ महापालिकांचं उत्पन्न बुडालं असते' असंही त्यांनी म्हटलंय.
'नवसाचं बाळ असावं असं जनता तुमच्यावर प्रेम करत होती, नवसाचं बाळ वाह्यात झालंय असं कळाल्यानंतर जनतेने तुमच्या कानाखाली मारली तर तुम्ही त्यांना दोष देऊ नका...' असं म्हणत त्यांनी भाजपला सावधानतेचा इशाराही दिलाय.