दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : प्रतितास केवळ 25 मिमी पडलेल्या पावसाचे पाणी वाहण्याची मुंबईतील गटारांची क्षमता असून मुंबईतील गटारे गाळाने भरली असल्याचे कॅगने आपल्या अहवालात समोर आणले आहे. मुंबईत साचणाऱ्या पाण्यास मुंबई महापालिकेचा ढीसाळ कारभार आणि हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचं कॅगने आपल्या अहवालात उघड केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेत आज मांडण्यात आलेल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या पूर आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई का तुंबते याची उत्तरे कॅगने आपल्या अहवालात समोर आणली आहेत. 


मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या पूर आपत्ती व्यवस्थापनातात कॅगला त्रुटी आढळून आल्या आहेत. 
कॅगच्या अहवालात मुंबई महापालिकेवर खालील ताशेरे ओढण्यात आले आहेत.


- मुंबईत बांधण्यात आलेले गटारे सपाट बांधण्यात आल्याने भरती, ओहोटीचा त्यावर परिणाम होतो
- गटारे प्रचंड गाळाने भरलेली आहेत
- पाण्याचा विसर्ग करणारी नलिका समुद्र पातळीच्या बरीच खाली आहे
- 45 विसर्ग नलिकांपैकी केवळ तीन ठिकठिकाणी पुराच्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी दरवाजे आहेत
- त्यामुुळे या तीनच ठिकाणच्या भरतीवर नियंत्रण ठेवता येऊ शकते
- 25 मिमी प्रतितास पावसासाठीच मुंबईतील गटारांची क्षमता
- मोठ्या नाल्यांमध्ये केबल्स, पाईपलाईन अडथळा ठरतात
- नाल्यांच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष
- छोटे नाले अयोग्य जागी असणे आणि प्रभावी नसणे
- नाल्यांची अयोग्य रचना


भूस्खलनाच्या घटना घडूनही ठोस उपाय नाही
मुंबईत 2015 ते 2017 या कालावधीत 33 भूस्खलनाच्या घटना घडल्या, ज्यात 12 जण जखमी झाले होते. मात्र या घटना वारंवार घडूनही मुस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. याबाबत जिऑग्राफीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालात भूस्खलनावर उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेला दिला होता. मात्र या अहवालाकडे महापालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा ठपकाही कॅगने ठेवला आहे.