मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वन्यजीव शिकारीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर-इंडिया (डब्ल्यूडब्ल्यूएफ) च्या अहवालानुसार वन्यजीव शिकार क्षेत्रात 'लक्षणीय वाढ' नोंदली गेली आहे. ३ जून रोजी बुधवारी ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन्यजीव शिकारीचा हा अभ्यास डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाकरता 'ट्रॅफिक' या वन्यजीव वाहतुकीवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने केला आहे. स्थानिक पातळीवरील तस्करीमध्ये पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढ झाल्याची नोंद ट्रॅफिक या तस्करीसंदर्भात काम करणाऱ्या संस्थेने केली आहे.


वन्यजीव शिकारीची ही तुलना दोन काळांमध्ये करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी १० फेब्रुवारी ते २२ मार्चे २०२० हा सहा आठवड्यांचा काळ. तर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरचा २३ मार्च ते ३ मेपर्यंतचा सहा आठवड्यांचा काळ. या काळात तस्करीमध्ये पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढ झाली आहे. 


लॉकडाऊनच्या काळात ८८ वन्यजीव शिकारीच्या घटनांची नोंद झाली आहे. तर लॉकडाऊन अगोदर ३५ शिकारींची नोंद झाली आहे. वन्यजीव शिकारींमध्ये झालेली वाढ ही फक्त लॉकडाऊनमुळे आहे. 


लॉकडाऊनमध्ये ससा, साळिंदर, खवले मांजर, शेकरू, उदमांजर, रानमांजर, वानर या लहान सस्तन प्राण्यांची सर्वाधिक शिकार झाली आहे. यामधील काही प्राण्यांन वन्यजीव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. परंतु, लॉकडाऊनदरम्यान या प्राण्यांची शिकार केवळ मांसासाठी करण्यात आली आहे. 


या संपूर्ण प्रकरणात २२२ लोकांना वन्यजीव शिकार प्रकरणात अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे लॉकडाऊनमध्ये ८५ लोकांना अटक केलं आहे.