मुंबई: मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या पदावर आता कोणाची वर्णी लागणार याकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची ३१ ऑगस्टला पदाचा कार्यकाळ संपत आहेत. त्यांच्यानंतर आयुक्तपदासाठी २९ अधिकाऱ्यांपैकी प्रामुख्य़ाने तीन नावे समोर येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये महाराष्ट्र गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त रश्मी शुक्ला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह आणि पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांचे नाव चर्चेत आहे. हे तिन्ही अधिकारी सगळे १९८८ च्या आयपीएस बॅचचे आहेत. 


यापैकी रश्मी शुक्ला पुणे विभागाच्या आयुक्त होत्या. सध्या त्या गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली तर त्या या पदावर येणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत. तर डॉ. व्यंकटेशम यांनी पुणे आणि नागपूर विभागाचा आयुक्तपदाचा कारभार सांभाळला आहे. 


तर परमबीर सिंह हे यापूर्वीही आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना डावलून संजय बर्वे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नेमणूक केली होती. ते ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. सध्या परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत. त्यामुळे आता परमबीर सिंह यांना संधी मिळणार का, याकडे अनेकांचे लक्ष आहे.


दरम्यान, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संजय बर्वे यांना पोलीस आयुक्तपदी मुदतवाढ देण्याचाही विचार करत आहेत. आयुक्तपदी नियुक्ती करताना अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता, कार्यक्षमता आणि सचोटीवर हे निकष ध्यानात घेतले जातात.