दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लॉकडाऊनबाबत आजच निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी झी 24 तासशी बोलताना यासंदर्भात  संकेत दिले आहेत. लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. टास्क फोर्सशी आणि व्यापाऱ्यांशी देखील चर्चा केल्याचे ते म्हणाले.आपल्याकडे रुग्ण जास्त आहेत. आपण मुंबईत ४ नवीन कोविड सेंटर सुरू करतोय. साखळी तोडायचा दोन आठवड्यापासून आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे आज मोठा निर्णय होऊ शकतो असे अस्लम शेख म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रयत्न करूनही साखळी तोडली जात नाहीय. आपल्याला चांगल्या गाईडलाईन्स आणाव्या लागतील, त्यासाठी काम सुरू आहे. मुंबई आणि राज्यातील स्थिती अजून हाताबाहेर नाही. आज SOP तयार करून मुख्यमंत्री आणि आघाडीतील नेते त्याबाबत निर्णय जाहीर करतील असे पालकमंत्री म्हणाले. 



टास्क फोर्समध्ये काही जणांनी २१ दिवस, काही जणांनी १४ तर काहींनी ८ दिवसांसाठी SOP लावण्याची सूचना केली आहे. सगळ्यांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेत आहोत. मागील वेळस अचानक लॉकडाऊन करून लोकांचे हाल केले, तसं यावेळी होऊ नये याची आम्ही काळजी घेतोय असेही अस्लम शेख म्हणाले. 


मुख्यमंत्र्यांचे आवाहन


कोरोना विषाणूवर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याच्या आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे. आरोग्य सेवक, परिचारीका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणातील कोविडयोद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबूया.  नेहमीच्या प्रथा-परंपरांना थोडं बाजुला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करुया. गर्दी नकोच, मास्क अनिवार्य आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीतून कोरोनावर मात करणे ही आरोग्याची गुढी यावर्षी महत्वाची आहे. यातून येणारे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी, सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, असा विश्वास आहे. या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.