महिलेला `जाडी` म्हटल्याने एकावर गुन्हा दाखल
कोणत्याही महिलेवर एखादी व्यंगात्मक शेरेबाजी करणं तेदेखील सोशल मीडियावर तुम्हाला महागात पडू शकतं...
अजित मांढरे, झी २४ तास, मुंबई : कोणत्याही महिलेवर एखादी व्यंगात्मक शेरेबाजी करणं तेदेखील सोशल मीडियावर तुम्हाला महागात पडू शकतं...
कारण कायद्यातील तरतूद पाहता एखाद्या महिलेवर शारीरिक शेरेबाजी करणं हा गुन्हा आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये असाच एक गुन्हा दाखल झालाय. सोशल मीडियावर महिलेवर केलेल्या शेरेबाजीमुळे एका व्यक्तीवर महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गंभीर कायदेशीर कारवाई
फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सऍप, स्नॅपचॅट यासारखे सोशल मीडियांवर अनेकजण आपली मत मांडत असतात. मात्र सोशल मीडियीवरील मतामुळे किंवा टिपण्णीमुळे एखाद्याला गंभीर कायदेशीर कारवाईलाही सामोर जावं लागू शकतं.
ट्विटरवर केली होती कमेंट
मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये असाच एक गुन्हा दाखल झालाय. ट्विटर या सोशल मीडियावर एका महिलेला एका व्यक्तिनं 'जाडी' म्हणजेच 'लठ्ठ' अशी कमेंट केलीय. ही कमेंट त्याला महागात पडलीय. अशाप्रकारच्या शेरेबाजीमुळे त्या व्यक्तिवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियावर ही शेरेबाजी करण्यात आल्यानं जाहीररित्या त्या महिलेची बदनामी झाली असून महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
खरं तर कायद्यात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक तरतूदी आहेत. पण, त्याची माहिती सर्वसामान्यांना विशेष करुन महिलांना नसल्यानं अशा प्रकारच्या घटनांकडे महिला दुर्लक्ष करणचं पसंद करतात.
लज्जा उत्पन्न झाल्यास विनयभंगाचा गुन्हा
एखाद्या महिलेकडे टक लावून बघितल्यास त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. महिलेच्या शरीराला तिच्या इच्छेविना स्पर्श केल्यास विनयभंग तसंच छेडछाडीचा गुन्हा दाखल होऊ शकतो एखाद्या महिलेला शिविगाळ करणं, शाररीक शेरेबाजी करणं हादेखील विनयभंगाचा गुन्हा ठरु शकतो.
सोशल मीडियावर किंवा इतरत्र महिलेवर अश्लिल किंवा महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी शेरेबाजी करणं यामुळे देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. कोणत्याही सुसंस्कृत समाजात महिलेचा सन्मान हा सर्वोच्च मानला जातो...आणि त्यांचा सन्माम राखला जावा यासाठी कायद्याचं संरक्षणहीदेखील आहे. यामुळे प्रत्येकानं महिलेचा सन्मान केलाचा पाहिजे.