मुंबईत आलेल्या भुज एक्सप्रेसमध्ये महिलेची हत्या
ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा शोध अद्याप लागला नाही.
मुंबई : सुरतहून मुंबईला आलेल्या भुज एक्स्प्रेसच्या महिला डब्यात एका ४० वर्षीय महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भुज-दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडलीये. गाडी दादर स्थानकात पोहोचल्यानंतर ही हत्या झाल्याचं उघड झालं. पोलीसांनी याप्रकरणी वेगाने तपास सुरू केलाय.
धारधार शस्त्रानं हत्या
भूज-दादर एक्सप्रेसमध्ये एका महिलेची गळा चिरुन हत्या केल्याचं उघड झालंय. ट्रेन दादर स्थानकात पोहोचल्यानंतर हे समोर आलं. याप्रकरणी अज्ञातव्यक्तीविरोधात ३०२ कलमानुसार गुन्हा दाखल केला.. दादीया देवी शंकर चौधरी असे मृत महिलेचे नाव असून या महिलेच्या अंगावरील दागिने आणि अन्य सामान गायब आहेत.
लुटण्याच्या उद्देशाने ही हत्या झाली असून बोरीवली ते दादर दरम्यान ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यामध्ये या महिलेचा मृतदेह आढळला.
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादीया देवी या गुजरात सूरतच्या रहिवासी होत्या.
मुंबईला त्या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी येत होत्या. गृहिणी असलेल्या दादीया देवी यांना नवरा आणि तीन मुले असा परिवार आहे.
सीसीटीव्ही तपासणार
या प्रकरणी मुंबई सेंट्रल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रेल्वे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी दादर आणि ट्रेन थांबलेल्या अन्य रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा पत्ता लावणे सोपे होणार आहे.