Women`s Day : राज ठाकरेंकडून महिलांना महत्वाचा संदेश
महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे
मुंबई : जगभरात ८ मार्च हा दिवस (8th March World Women's day) 'जागतिक महिला दिन' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाच्या जीवनात महिलेला अनन्यसाधारण महत्व आहे. या महिलांच्या योगदानाला आणि स्त्रीत्वाला साजरा करणारा हा दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Post on Women's Day) यांनी तमाम महिला वर्गाला महत्वाचा संदेश दिला आहे.
काय म्हणतात राज ठाकरे?
८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही.
आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, "बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील" त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो.
मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही.
राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता.
बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.
आपला नम्र,
राज ठाकरे
८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा,...
Posted by Raj Thackeray on Sunday, March 7, 2021
असं म्हणत राज ठाकरे यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात, असं म्हणत महिलांच मनोबल वाढवलं आहे. आज महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशा वेळी महिलांनी गप्प न राहता अन्यायाविरोधात आवाज उठवायला हवा.